
उल्हासनगर : उल्हासनगरच्या रस्त्यावर पुन्हा एकदा तणावाचे ढग दाटले आहे. कॅम्प नंबर ३ मध्ये ग्राहक आणि दुकानदारामधील किरकोळ वाद क्षणार्धात तुफानी हाणामारीत परिवर्तित झाला. वस्तूच्या किमतीवरून सुरू झालेला वाद इतका चिघळला की त्याचे पडसाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले. सोमवारी दुपारी ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, आता याचे पडसाद संपूर्ण शहरात उमटत आहेत.
उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक तीनमधील एका जनरल स्टोअरमध्ये ग्राहक आणि दुकानदारामध्ये झालेल्या वादातून मोठ्या हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. अनिल तोतानी यांच्या जनरल स्टोअरमध्ये सोमवारी दुपारी रोहित भगवाने हा आपल्या पत्नी आणि मुलासह खरेदीसाठी आला होता. यावेळी त्यांनी खेळण्याचा एक बॉल विकत घेतला, मात्र त्या बॉलच्या किमतीवरून रोहित आणि दुकानदार अनिल यांच्यामध्ये वाद सुरू झाला.
सुरुवातीला तोंडाने सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याच दरम्यान, दुकानदार अनिल तोतानी मोबाइलमध्ये संपूर्ण घटना चित्रीत करत होता, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, याच गोष्टीवर आक्षेप घेत ग्राहक रोहितने मोबाइल हिसकावून तो फोडून टाकला.
या झटापटीत रोहित भगवाने आणि त्याच्या पत्नीवर लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, दुकानदार अनिललाही मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.