मोर्चाच्या आयोजकांवर पोस्काे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आत्महत्या करणाऱ्या तरूणीला न्याय मिळावा यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता
मोर्चाच्या आयोजकांवर पोस्काे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

सात लिंगपिसाटांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या तरूणीला न्याय मिळावा यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चेकऱ्यांवरच फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. मोर्चा दरम्यान मृत तरुणीचे नाव बॅनर्सद्वारे उघड केल्याने पोलिसांनी मोर्चाच्या आयोजकांवर पोस्काे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पूर्वेकडील काटेमानिवली परिसरातल्या एका इमारतीत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर सात जणांकडून मागील दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरू होते. वारंवार होत असलेल्या या अत्याचारांना कंटाळून या तरुणीने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोळसेवाडी पोलिसांनी सात तरुणांसह तिच्या एका मैत्रिणीला अटक केली. हे आठ जण सद्या पोलीस कोठडीत आहेत. आत्महत्या केलेल्या केलेल्या तरूणीला न्याय मिळावा यासाठी कल्याण पूर्वेत रविवारी १९ जून रोजी संध्याकाळी चक्कीनाका ते कोळसेवाडी पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात गावदेवी प्रतिष्ठान, व्ही. जे. फॅमिली, गावदेवी महिला बचत गट, तिसाई चालक-मालक संघटना, बाबा बोडके विद्यालय, सिद्धार्थ विद्यामंदिर, सम्यक विद्यालय, न्यू सहकार मित्र मंडळ, कै. अनंतशेठ गवळी रिक्षा स्टँड, आदी संघटनांचे बॅनर्स हाती घेऊन शेकडोच्या संख्येने आंदोलकांनी हा मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चात पीडीत तरूणीचे नाव उघड केल्याप्रकरणी मोर्चाच्या आयोजकांवरच पोस्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत तरूणीला न्याय मिळवून देण्यासाठी आयोजकांनी काढलेल्या मोर्चात हाती घेतलेल्या बॅनर्सवर पिडीत मृत तरुणीचे नाव उघड करण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोर्चाच्या आयोजकांवर भादंवि कलम २२८ (अ) सह पोस्को कायद्याचे कलम २३ (२), (४) अन्वये कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in