नवशक्ती इम्पॅक्ट! अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात तात्पुरत्या शेडची उभारणी; पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना दिलासा

बदलापूर रेल्वे स्थानकात असलेल्या अर्धवट शेडमुळे प्रवाशांना छत्री डोक्यावर घेऊन लोकलची वाट पाहण्याची वेळ आली आहे.
नवशक्ती इम्पॅक्ट! अखेर बदलापूर रेल्वे स्थानकात तात्पुरत्या शेडची उभारणी; पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना दिलासा
Published on

विजय पंचमुख /बदलापूर

बदलापूर रेल्वे स्थानकात असलेल्या अर्धवट शेडमुळे प्रवाशांना छत्री डोक्यावर घेऊन लोकलची वाट पाहण्याची वेळ आली आहे. बदलापूरहून लोकल प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील शेडच्या रखडलेल्या कामाचा फटका बसत असल्याची बातमी दै. ‘नवशक्ति’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचा इफेक्ट म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात शेडच्या प्रतीक्षेत असलेल्या बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना तात्पुरती का होईना शेड मिळाली आहे. नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या पाहणी दौऱ्यानंतर रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरूपाची शेड उभारली असून त्यामुळे पावसात भिजत किंवा डोक्यावर छत्री घेऊन प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत उभे राहावे लागत असलेल्या रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर असलेल्या अर्धवट शेडमुळे गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रवाशांना उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करत तर पावसाळ्यात प्लॅटफॉर्मवर भिजत लोकलची वाट पाहत उभे रहावे लागत होते. मात्र रेल्वे प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अलीकडेच बाळ्यामामा यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला. यावेळी होम प्लॅटफॉर्मच्या संथगती कामासह अन्य कामात होत असलेल्या विलंबाबद्दल त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रलंबित असलेली कामे उरकण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तर तांत्रिक अडचणी असलेली कामे वगळता इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे प्रवशानची होत असलेली गैरसोय दूर करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने बदलापूर रेल्वे स्थानकात ज्या ठिकाणी अर्धवट शेड होत्या त्याठिकाणी तात्पुरती शेड उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

इतर समस्यांबाबतही पाठपुरावा हवा

बदलापूर रेल्वे स्थानकातील पाहणी दौऱ्यात नवनिर्वाचित खासदारांनी रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्या दूर करण्याची मागणी केल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरूपात का होईना शेड उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकात प्रलंबित असलेली इतर कामे तसेच लोकल गाड्यांची संख्या वाढवणे, महिला स्पेशल लोकल सुरू करणे, १५ डब्यांच्या लोकल बदलापूरपर्यंत आणणे, लोकल व फलाटातील अंतर कमी करणे आदीसाठीही नवनिर्वाचित खासदारांनी प्रयत्न करावेत, अशी रेल्वे प्रवशांची अपेक्षा आहे.

डोंबिवली स्थानकात छताअभावी प्रवाशांचे हाल

डोंबिवली : रेल्वे प्रशासनाकडून एफओबीचे काम सुरू असून याकरीता फलाटावरील छत काढण्यात आले आहे मात्र याचा त्रास प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऐन पावसाळ्यातच हे काम सुरू केल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावर छत्री घेऊन लोकलची वाट पहावी लागत आहे. याची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेने मंगळवारी डोंबिवली स्टेशन प्रबंधकाला जाब विचारला.

५ नंबर फलाटावरील अपुरी शेड, ३ नंबर फलाटावरील महिला डब्बा समोर प्रवाशांना उभे राहण्यासाठी अपुरी जागा, फलाटावरील अस्वच्छता गृह, उशीराने धावणारी लोकल सेवा व इतर नागरिकांच्या तक्रारींबाबत युवा सेनेचे सचिव दिपेश म्हात्रे, सागर जेधे, सागर दुबे यांसह पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली स्टेशन प्रबंधक अग्रवाल यांना जाब विचारला. सदर तक्रारी रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर सोडविण्यात आले नाही तर युवासेनेमार्फत डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी युवासेनेचे युवासेना निरीक्षक अभिषेक चौधरी, उप जिल्हा अधिकारी योगेश म्हात्रे, विधानसभा अधिकारी सागर दुबे होते.

- दीपेश म्हात्रे, सचिव युवासेना

डोंबिवली स्थानकावर एकीकडे रेल्वे प्रशासनाकडून एफओबीचे काम सुरू असून याप्रकरणी स्थानकावरील छत काढण्यात आले आहे. प्रवाशांना भरपावसात एका हातात छत्री आणि रेल्वे पकडण्याची धडपड यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे महिला स्वच्छतेसह इतर सुविधा डोंबिवली स्थानकात नसल्याने प्रवासी वर्गात व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत या समस्याबाबत डोंबिवलीतील काही प्रवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अधिवेशनात असल्याने शिवसेनेच्या युवा संघटनेकडून स्टेशनची पाहणी केली. यावेळी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन मास्तर यांना निवेदन देत रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक प्रशासन दुर्लक्ष करत असेल त्याचे परिणाम रेल्वेला भोगावे लागणार असल्याचा इशारा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in