अखेर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेने तातडीने  भरले खड्डे

अखेर कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेने तातडीने भरले खड्डे

हर घर तिरंगा अभियानातंर्गत नागरिक घरांवर, दुकानांवर, इमारतींवर तिरंगा ध्वज उभारून आनंद व्यक्त केला आहे.

बदलापुरात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा होत असताना नगर परिषद प्रशासनाला नगर परिषद कार्यालयासमोरील उड्डाणपूल रस्त्यावरील खड्ड्यांचा मात्र विसर पडला होता. यासंदर्भातील वृत्त रविवारी (ता.१४) दैनिक नवशक्तिने प्रसिद्ध केल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने तातडीने हे खड्डे भरले असून याबद्दल नागरिक दैनिक नवशक्तिचे आभार मानत आहेत.

यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. हर घर तिरंगा अभियानातंर्गत नागरिक घरांवर, दुकानांवर, इमारतींवर तिरंगा ध्वज उभारून आनंद व्यक्त केला आहे. कुळगाव - बदलापूर नगरपरिषद कार्यालयातही रंगरंगोटी करून जय्यत तयारी करण्यात आली होती. असे असताना नगरपरिषद कार्यालयासमोरील उड्डाणपूल रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांकडे मात्र नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. कुळगाव - बदलापूर नगरपरिषद कार्यालयासमोरून जाणाऱ्या बदलापूर पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या सुरुवातीलाच मोठमोठे खड्डे पडले होते. उड्डाणपूलाच्या मध्यभागीही मोठमोठे खड्डे पडले होते. पूर्वेकडील स्टेशन ते कात्रप रस्त्यावरून उड्डाणपूलावर जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले होते.

बदलापूर शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा हा एकमेव उड्डाणपूल असल्याने दररोज हजारो वाहनांची त्यावरून ये-जा सुरू असते. सध्या पाऊस सुरू असल्याने पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांची प्रचंड गैरसोय होत होती.मात्र नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.यासंदर्भातील वृत्त दैनिक नवशक्तीने प्रसिध्द केल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने १४ ऑगस्टला रातोरात हे खड्डे भरण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केले. त्यामुळे नागरिकांना तूर्तास खड्ड्यांपासून दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in