अखेर रेतीबंदर चौपाटीचे स्वप्न पूर्णत्वास! येत्या तीन महिन्यांत चौपाटी खुली होणार

पारसिक-मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील; तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
अखेर रेतीबंदर चौपाटीचे स्वप्न पूर्णत्वास! येत्या तीन महिन्यांत चौपाटी खुली होणार
Published on

ठाणे : पारसिक-मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत या चौपाटीचे काम पूर्णत्वास येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील; तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

दरम्यान, मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतवतो, मी आश्वासन देत नाही, मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली. आम्ही केवळ निधी आणतो असे म्हणत नाही, तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामे पूर्ण करतो, असेही ते म्हणाले.

सोमवारी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, २००९ मध्ये पारसिक चौपाटीचे स्वप्न पाहिले होते. आज ते सत्यात उतरविले आहे, येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचे उद‌्घाटन होईल.

चौपाटीवर १८ अत्याधुनिक सुविधा

ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जैस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले अन् चौपाटीचे काम मार्गी लावले. रेतीबंदर खाडीकिनारी चार किमी लांबीच्या ४२ एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत आहे. खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग, थीम पार्क, अ‍ॅम्फी थिएटर, बोटींग, क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधने यासह जवळपास १८ अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत, असे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

विकास करताना स्वप्ने दाखविली नाहीत

माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती. आपण प्रस्ताव मांडला की, एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते. सन २०१७ ते २०२१ दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालक मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकासनिधी थांबविला नाही. पूर्वी ठाण्यात निधीचे राजकारण कधीच झाले नव्हते. ते आता सुरू झाले आहे. तेव्हाचे ते एकनाथ शिंदे होते, मात्र आता त्यावर आपणाला काही बोलायचे नाही. मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा, मुंब्य्राचा विकास केला, हा विकास करीत असताना कधीही स्वप्ने दाखविली नाही, ती सत्यात उतरविण्याचे काम केले, असे डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- डॉ. जितेंद्र आव्हाड

logo
marathi.freepressjournal.in