अखेर अक्षय गुडदे यांची उचलबांगडी; दिवा सहाय्यक आयुक्त पदाचाही पदभार काढला

स्थावर मालमत्ता आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरलेले दिव्याचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांची अखेर स्थावर मालमत्ता विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे.
अखेर अक्षय गुडदे यांची उचलबांगडी; दिवा सहाय्यक आयुक्त पदाचाही पदभार काढला

ठाणे : स्थावर मालमत्ता आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरलेले दिव्याचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांची अखेर स्थावर मालमत्ता विभागातून उचलबांगडी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार देखील काढून टाकण्यात आला आहे. स्थावर मालमत्ता विभागाचा कार्यभार तसेच दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्याकडे देण्यात आला आहे, तर अक्षय गुडदे यांना कळवा प्रभाग समितीच्या सहाय्य आयुक्त पदाचा पदभार देण्यात आला आहे.

दिवा प्रभाग समितीमध्ये होत असलेल्या अनाधिकृत बांधकामांबाबत अक्षय गुडदे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. दिव्याचे सहाय्यक आयुक्त हे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत असल्याचा आरोप देखील उबाठा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. तर सर्वात गंभीर बाब म्हणजे सदनिका हस्तांतरासाठी अक्षय गुडदे यांनी आपल्या स्वीय सहाय्यकाकडून ५ लाख रुपये मागितले असल्याचा आरोप माजी महापौर अशोक वैती यांनी केला होता. विशेष म्हणजे, यासंदर्भात वैती यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे सत्य प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते. यावर पालिका आयुक्तांनी अक्षय गुडदे यांच्याकडे यासंदर्भात खुलासा देखील मागवला होता; मात्र गुडदे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य केले नव्हते. स्थावर मालमत्ता विभागातील त्यांचा कारभार देखील वादग्रस्त ठरला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर आता स्थावर मालमत्ता विभागाचा तसेच दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदाचा कार्यभार अक्षय गुडदे यांच्याकडून काढण्यात आल्याने पालिका वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मंगळवारी संध्याकाळी उशिरा ही बदलीची ऑर्डर काढण्यात आली आहे.

कळव्यात वादग्रस्त अधिकारी का?

दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त असताना आधीच अनधिकृत बांधकामांना संरक्षण देत असल्याच्या अक्षय गुडदे यांच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत. काही महिन्यांपूर्वी कळव्याचे सहाय्यक आयुक्त असताना सचिन बोरसे यांच्यावरही अशाप्रकारे ठपका ठेवण्यात आला होता; मात्र सचिन बोरसे यांची जेव्हा दुसऱ्यांदा कळव्यात बदली झाली त्यानंतर मात्र त्यांनी कळव्यातील अनधिकृत बांधकामांना चाप लावला आहे; मात्र आता कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तपदी अक्षय गुडदे यांच्यासारख्या वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली करून प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.

पालिकेतील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणा, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची मागणी

ठाणे : महानगरपालिकेत सध्या सर्वच विभागांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांची चलती झाली आहे. लिपीकांना थेट सहाय्यक आयुक्त ते उपायुक्तपदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आल्याने पालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदावर आणून त्यांच्याकडून अतिरिक्त वेतनाची रक्कम वसूल करावी, अशी मागणी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने केली आहे.

ठाणे महापालिकेत सध्या सर्वत्र सावळा गोंधळ आहे. अनेक अधिकारी हे लिपीक असून, त्यांना सहाय्यक आयुक्त तसेच प्रभारी उपायुक्तपदाचा पदभार देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय, स्पर्धा परीक्षा न देता हे अधिकारी मोक्याच्या जागांवर बसलेले असल्याने धोरणात्मक निर्णय घेणे त्यांना शक्य होत नाही. परिणामी ठाणेकरांच्या करातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय होत असल्याने त्या प्रभारींना मूळ पदावर आणावे. अन्यथा, येत्या १५ ऑगस्ट रोजी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in