६८ अनधिकृत शाळांच्या विरोधात FIR दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८१ अनधिकृत शाळा असून त्यात १९७०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व ८१ शाळांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
६८ अनधिकृत शाळांच्या विरोधात FIR दाखल
freepik
Published on

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८१ अनधिकृत शाळा असून त्यात १९७०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व ८१ शाळांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यापैकी ६८ शाळांच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून उर्वरित १३ अनधिकृत शाळांविरोधात एफआयआर नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनधिकृत शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे इतर अधिकृत शाळांत समायोजन करण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिृकत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला. या शाळांची नोंदणी नाही. काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत. काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाड्याच्या जागेत असल्याची माहिती उपायुक्त (शिक्षण) सचिन सांगळे यांनी दिली. या सर्व अनधिकृत शाळांची यादी स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच, शिक्षण हक्क कायद्यानुसार या अनधिकृत शाळांना ५२ कोटी रुपयांचा दंडही करण्यात आल्याचेही उपायुक्त सांगळे यांनी सांगितले.

अनधिकृत शाळांपैकी सर्वात जास्त शाळांची संख्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रात आहेत. त्या अनुषंगाने दिवा प्रभाग समितीने या अनधिकृत शाळांविरुद्ध कार्यवाही सुरू केलेली आहे. आतापर्यंत ३२ अनधिकृत शाळांची नळ जोडणी खंडित केली आहे. या अनधिकृत शाळांच्या बाबतीत शहर विकास विभागाकडील अनधिकृत बांधकामाच्या यादीनुसार अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित आहे.

ज्या अनधिकृत शाळा नियमित होऊ शकतील त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मांडली आहे. ८१ पैकी ०५ शाळांनी त्यादृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा प्रस्ताव दिला आहे. उर्वरित ७६ शाळांकडून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना नजिकच्या अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्याचाही विचार सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in