
भिवंडी : शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या ठक्कर कॉम्प्लेक्समधील दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये मंगळवारी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास अचानक एअर कंडिशनच्या मशिनमधून धूर निघाल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण क्लासेसचे वर्ग जळून बेचिराख झाले.
शहरातील ठाणे आळीत ठक्कर कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे दुसऱ्या मजल्यावर असलेल्या विनटॉप क्लासेसमध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थी अभ्यास करीत होते. अचानकपणे क्लासमध्ये असलेल्या एअर कंडिशनच्या मशिनचा कॉम्प्रेसर फुटून त्यामधून धूर येऊ लागला. त्यामुळे खबरदारी घेत क्लासेसमधील सर्व ४० विद्यार्थी क्लासबाहेर पडली आणि त्यांना तळमजल्यावर आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती क्लासचे शिक्षक राजू गुप्ता यांनी दिली.
या आगीची झळ हळूहळू क्लासच्या तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्याच क्लासला लागून नुकसान झाले. दरम्यान अग्निशामकच्या दोन गाड्या घटनास्थळी आल्या आणि त्यांनी आग पूर्णपणे विझविल्याने ठक्कर कॉम्प्लेक्समधील पुढील अनर्थ टळला. यावेळी टोरंट पॉवर कंपनीच्या टीमने घटनास्थळी येऊन आजूबाजूचा वीजप्रवाह खंडित केला. त्यामुळे आग विझविण्यास व्यत्यय आला नाही. मात्र विनटॉप क्लासेसच्या संपूर्ण मालमत्तेचे नुकसान झाले. ही घटना बाजारपेठेच्या ठिकाणी झाल्याने घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.