गृहसंकुले, आस्थापनांना अग्निसुरक्षेचे धडे; वर्षभरात ४५० पेक्षा अधिक आगीच्या घटना

ठाण्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून गेल्या दहा ते १२ वर्षांत शेकडो गृहसंकुले आणि आस्थापनांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा काही प्रमाणात तोकडी असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.
गृहसंकुले, आस्थापनांना अग्निसुरक्षेचे धडे; वर्षभरात ४५० पेक्षा अधिक आगीच्या घटना

ठाणे : शहरात उंच इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यामध्ये आगीची घटना घडल्यास अग्निशमन दल येण्याआधीच त्यातून नागरिकांची सुरक्षा व्हावी या दृष्टीने शहरातील मोठी गृहसंकुले आणि आस्थापनांमध्ये ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने अग्निसुरक्षेचे धडे दिले जाणार आहेत. आग लागल्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात प्रत्यक्षात प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार असून यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीची तीव्रता कमी करता येणार आहे.

ठाण्यात शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढले असून गेल्या दहा ते १२ वर्षांत शेकडो गृहसंकुले आणि आस्थापनांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेमध्ये अग्निसुरक्षेची यंत्रणा काही प्रमाणात तोकडी असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. अग्निशमन विभागात अद्ययावत उपकरणे असली तरी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने जवानांना बचावकार्य करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक मोठ्या गृहसंकुलांमध्ये किंवा आस्थापनांमध्ये आग विझवण्याची यंत्रणा असूनही बऱ्याचवेळा या यंत्रणेचा वापर कसा करावा हे नागरिकांना माहिती नसते.

परिणामी अग्निशमन येईपर्यंत आगीची तीव्रता वाढलेली असते. ही तीव्रता वाढू नये यासाठी शहरातील नागरिकांना त्यांची कर्तव्य आणि जबाबदारी यासंदर्भात पॉवर पॉइंटच्या आधारे माहिती दिली जाणार असून प्रात्यक्षिक देखील करून दाखवले जाणार आहे. सर्वात आधी अग्निशमन विभागाला माहिती देणे क्रमप्राप्त असले तरी त्यानंतर आपल्याकडील साधनांचा वापर कसा करायचा याबाबतचे धडे नागरिकांना आठवडाभर दिले जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांनी दिली आहे.

गेल्या वर्षभरात ठाण्यातील विविध भागात सरासरी ४५० पेक्षा अधिक आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये होरायझन बिजनेस पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. दरम्यान, बचावकार्य करताना शहीद झालेल्या जवानांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

सुरक्षा यंत्रणाही तोकडीच...

ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात अजूनही २१२ पदे ही रिक्त असून ती अद्याप भरली गेलेली नाही. यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, केंद्र अधिकारी, सहाय्यक केंद्र अधिकारी, लिडिंग फायरमन, चालक/यंत्रचालक आणि फायरमन या सर्व पदांचा समावेश आहे. मुंबई बंदरात १४ एप्रिल, १९४४ रोजी लागलेल्या आगीत अग्निशमन जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ अग्निशमन दिन साजरा केला जातो. या प्रसंगी ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त (अग्निशमन विभाग) दिनेश तायडे, अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीश झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी आदी उपस्थित होते. याचवेळी, महाराष्ट्र फायर सर्व्हिस असोसिएशनच्या देणगी पेटीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मागील वर्षभरात ८५० पेक्षा अधिक दुर्घटना

ठाणे शहरात गेल्या वर्षभरात ८५० पेक्षा अधिक दुर्घटना घडल्या असून यापैकी सर्वाधिक ४५० पेक्षा अधिक घटना या आगीच्या आहेत. यामध्ये गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लागलेली होरायझन बिजनेस पार्कला लागलेली आगी ही मोठी आगीची घटना होती. ही आग विझविण्यासाठी ठाणे महापालिकेला मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली व मीरा-भाईंदर या पाच महापालिकेची तसेच एअर फोर्सची मदत घ्यावी लागली होती. २३ कार्यालय, तीन कार व २३ दुचाकी या आगीत जाळून खाक झाल्या होत्या, यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती.

रिक्त असलेली पदे

  • पद - मंजूर - भरलेली - रिक्त

  • मुख्य अग्निशमन अधिकारी - १ - ० - ०

  • विभागीय अग्निशमन अधिकारी - १२ - ० - १२

  • केंद्र अधिकारी - २१ - १५ - ६

  • सहाय्यक केंद्र अधिकारी - ५६ - ६ - ५०

  • लिडिंग फायरमन - ७० - ६३ - ७

  • चालक/यंत्रचालक - २२४ ३० १९४

  • फायरमन - ४५० - ९७ - ३५३

  • एकूण - ८३५ - २१२ - ६२३

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in