नेत्यांमधील समन्वयाच्या अभावाने गोळीबार; माजी आमदार नरेंद्र पवार यांची माहिती

कल्याण पूर्वेत भाजप आमदाराकडून गोळीबाराची घडलेली घटना चुकीची आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही
नेत्यांमधील समन्वयाच्या अभावाने गोळीबार; माजी आमदार नरेंद्र पवार यांची माहिती

कल्याण : कल्याण पूर्वेत शिवसेना- भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. याची माहिती असूनही त्याकडे शिवसेना, भाजपकडील दोन्ही नेत्यांनी दुर्लक्ष केले. या समन्वयाच्या अभावामुळे आलेल्या नैराश्यातून ही दुर्दैवी घटना घडली आहे, अशी माहिती कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी माध्यमांना दिली. कल्याण पूर्वेत भाजप आमदाराकडून गोळीबाराची घडलेली घटना चुकीची आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. परंतु, असे करण्यापर्यंतची वेळ का आली, याचाही विचार करण्याची गरज आहे. एखादी घटना सतत घडत असेल आणि त्या विषयी कोणीही काही करत नसेल. न्याय मिळत नसेल तर नैराश्य येते. या उद्विग्नतेतून गोळीबाराचा प्रकार घडला आहे, असे माजी आमदार पवार यांनी सांगितले.

या घटनेमुळे शिवसेना, भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये अनाश्यक दुरावा निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका पाहता हा दुरावा युतीला परवडणारा नाही. त्यामुळे शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन हा दुरावा दूर करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे, असे माजी आमदार पवार यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर काही अडचणी होत्या. त्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पण त्याची दखल शिवसेना, भाजपच्या नेत्यांनी न घेतल्याने आलेल्या नैराश्यातून दुर्दैवी प्रकार घडला.

आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले असले तरी, शिवसेना-भाजपचे नेते सामंजस्याने हा विषय संपुष्टात आणतील. केवळ एक घटनेमुळे युतीत तणाव निर्माण होणार नाही. यावर आमचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in