
भाईंदर : अवकाळी पावसामुळे भाईंदर पश्चिमेच्या उत्तन भागातील सुकत ठेवलेली मासळी भिजून मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे. मच्छिमारांना शेतकरी यांच्या धर्तीवर नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.
भाईंदर पश्चिमेच्या उत्तन परिसरात कोळी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात त्यांचा मूळ व्यवसाय मासेमारी आहे. उत्तन परीसरात ८०० बोटी आहेत. मासेमारी हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने मासे कमी प्रमाणात मिळत होते. मासेमारीसाठी समुद्रात बोट गेल्यानंतर परत येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च येतो. मासे कमी मिळाल्याने झालेला खर्च देखील मिळत नाही. त्यामुळे मच्छिमारांचे नुकसान होत होते. त्यामुळे कर्ज काढून अनेक मच्छिमार मासेमारी साठी जात आहेत. केलेला खर्च देखील निघत नसल्याने मच्छिमार हवालदिल झाले आहेत.
मच्छिमारांचा शेवटचा हंगाम सुरू झाला आहे. या शेवटच्या हंगामात मिळालेले मासे सुकवून ते पावसाळ्यात विक्री केले जातात. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने या सुकवलेली मासे विकून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. आता शेवटच्या हंगामात मासे मिळण्यास सुरुवात झाली तर अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. अनेक मच्छिमारांनी मासे सुकविण्यासाठी बाहेर टाकली होती.
मासळी सुकण्यासाठी टाकण्यात आलेले मासे पावसामुळे पूर्णपणे भिजून खराब झाले आहेत. मे महिन्यात अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना समुद्रात मासे मिळाले नाही. आता शेवटच्या हंगामात मासे मिळत आहेत, परंतु २२ मे ते ३० मे दरम्यान वादळी वारे सांगितल्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी समुद्रातून बाहेर येण्यासाठी निघाल्या आहेत. परत आलेल्या बोटी मासेमारीसाठी पुन्हा समुद्रात जातील की नाही याची शास्वती नाही. शेवटच्या दिवसात वादळी वारे येणार असल्यामुळे मासेमारी बंद करावी लागणार असल्याने मच्छिमारांवर मोठे संकट आले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज आहे.
उत्तन समुद्रकिनारी मासळी सुकवलेली असताना पावसामुळे ती नाशवंत झाली आहे. त्यामुळे कोळी महिलांना अश्रू अनावर होत आहेत. गेले चार महिने विविध कारणांनी मासळीचा दुष्काळ सहन करावा लागला. आता शेवटच्या हंगामात हाती आलेली मासळी सुकवण्यास ठेवलेली असताना अचानक आलेल्या पावसाने ती भिजून गेली आहे. शासनाने मच्छिमार यांना मदत करावी अशी मागणी माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी केली आहे.
नुकसानभरपाई देण्याची मागणी
मासेमारी करणाऱ्यांना कृषी दर्जा देण्यात आल्याची घोषणा केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते त्याचप्रकारे मच्छिमारांना देखील शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छिमार नेते तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी बर्नड डिमेलो यांनी केली आहे.