
डहाणू : गुजरातच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ‘नामे निराली’ या बोटीला गुरुवारी भीषण अपघात झाल्याने पालघर जिल्ह्यातील झाई गावातील चार मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दोन मच्छिमार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.
‘नामे निराली’ ही मासेमारी बोट १८ फेब्रुवारी रोजी १० खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाली होती. तब्बल १६ दिवस मासेमारी केल्यानंतर गुरुवारी ही बोट परतत असताना तिला अपघात झाला. या दुर्घटनेत चार मच्छिमारांचा जागीच बुडून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी अवस्थेत बचावले. या अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी, सूर्या शिंगडा या चार मच्छिमारांचा मृत्यू झाला असून अनिल वांगड आणि जलाराम वळवी हे गंभीर जखमी आहेत.
मृत चौघेही पालघर जिल्ह्यातील झाई गावातील रहिवासी होते. या घटनेनंतर गावात शोकाकूल वातावरण असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर मच्छीमारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.