ठाणे : केवळ वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याने शस्त्रक्रिया रखडल्याचे प्रकरण ताजे असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गुरुवारी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी थेट रुग्णालय गाठून डॉक्टर्सची चांगलीच कानउघाडणी केली. ‘‘जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशील लाल केले असते,’’ असे म्हणत सुमारे पाच तास मृतदेह आयसीयूमध्ये ठेवणाऱ्या डॉक्टरांना चांगलेच फैलावर घेतले.
दररोज शेकडो रुग्णांची वर्दळ असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी माजली आहे. कळवा रुग्णालयात रोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांसह जिल्ह्याच्या विविध भागांतून बाह्यरुग्ण विभागात ५०० च्या आसपास रुग्ण येतात. परंतु, केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांकडून उपचार मिळेपर्यंत एकेका रुग्णाला चार ते पाच तास लागतात. त्यातही अनेकदा डॉक्टर नसतात. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. बेड नसल्याचे कारण सांगून रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. परिणामी दूरवरून आलेल्या रुग्णांवर उपचार होतच नाहीत.
गुरुवारीही तसाच प्रकार सुरू असल्याची माहिती येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांनी जितेंद्र आव्हाड यांना फोनवरून दिली. ही माहिती मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी तडक छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय गाठून पाहणी केली. त्यावेळेस रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यातच एकीकडे बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून रुग्णांना दाखल केले जात नसतानाच दोन वाजता दगावलेल्या रुग्णांचे मृतदेह आयसीयूमध्येच ठेवले असल्याचे आव्हाड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आव्हाड प्रचंड संतापले. रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावर प्रशासन ठोस उत्तर देऊ न शकल्याने ‘‘पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असता, तर कानशील लाल केले असते,’’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.