Ulhasnagar News : ‘बागेश्वर धामचा प्रसाद’ म्हणत गुंगी देऊन फसवणूक, पाच जणांना अटक; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
उल्हासनगर : उल्हासनगरात धार्मिक श्रद्धेचा गैरवापर करत एका वृद्ध महिलेला तब्बल दीड वर्षे योजनाबद्ध पद्धतीने २४.६० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
‘बागेश्वर धामचा प्रसाद’, ‘विघ्न दूर करणारा बाबा’, ‘विशेष पूजांचे उपाय’ अशा आमिषांवर विश्वास बसवून गुंगीकारक मिठाई देऊन सोन्याची बांगडी चोरण्यापर्यंत पोहोचलेल्या या टोळीला विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली.
या प्रकरणाने धार्मिक नावाखाली सक्रिय असलेल्या फसवणूक रॅकेटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उल्हासनगर कॅम्प ४ मधील साई मेहरवान पॅलेस येथे राहणाऱ्या वृद्ध फिर्यादी शकुंतला आहुजा यांची जानेवारी २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२५ या काळात आरोपींनी टप्प्याटप्प्याने फसवणूक केली.
सुरुवातीला करिष्मा दुधाणीने “रूम मिळवून देतो” असा बहाणा करून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर करिष्मा, उषा शर्मा, लावीना शर्मा, साहिल दुधानी आणि यश शर्मा या पाच जणांनी मिळून धार्मिक विधी, विशेष होमहवन,‘विघ्न दूर करणारा बाबा’, ‘बागेश्वर धामचा प्रसाद’ अशा नावाखाली फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन केला आणि एकूण ८ तोळे सोनं, १० ग्रॅम हिरे आणि रोख रक्कम मिळून २४.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

