शिंदे आणि ठाकरे गटाकडून अंतर राखून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न; ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेला छावणीचे स्वरूप

१५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ तारखेला रात्री १२ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला
शिंदे आणि ठाकरे गटाकडून अंतर राखून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न;  ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेला छावणीचे स्वरूप

ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्यावतीने दरवर्षी रात्री १२ च्या ठोक्याला झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. यंदा मात्र राज्यात झालेल्या सत्तातरानंतर मध्यरातीच्या झेंडावंदनाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण पार पडले. तर स्थानिक पोलिसांनी ठाकरे गटाला दिलेल्या नोटीसीनंतर देखील खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील आपल्या कार्यकर्त्यासह झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान पहिल्यांदाच या ठिकाणी शिंदे आणि ठाकरे गटाकडून अंतर राखून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिवसेनेच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेला चक्क छावणीचे स्वरूप पहायला मिळाले.

१५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ तारखेला रात्री १२ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी शिवसेनेचे शिंदे समर्थक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील उपस्थित होते.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या ध्वजारोहणाचा उपक्रम हा पारंपारिक असून धर्मवीर आनंद दिघे यांच्या पश्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी नियमितपणे ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम न चुकता पार पाडतात. या ध्वजारोहणा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे नौपाडा पोलिसांनी ठाकरे गटातील खासदार जिल्हाप्रमुख यांच्यासह अनेक शिवसैनिक कार्यकर्त्यांना नोटीस देखील बजावली होती.

दरम्यान खासदार विचारे यांनी दुपारी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आम्हाला कार्यक्रमस्थळी हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली, मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून परवानगी नाकारली, मात्र काहीही झाले तरी आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार असा इशारा दिल्यानंतर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी माध्यमांना त्या ठिकाणी बोलवून स्वतंत्र दिनाच्या या कार्यक्रमाला राजकरण नको, ज्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे,त्यांनी यावे असे स्पष्टीकरण दिल्यानंतर हा ध्वजारोहण सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

त्याबरोबरच दिवंगत मराठा समाजाचे आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना देखील श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याची खंत देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. विनायक मेठे यांनी मराठी समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलन केली, संघर्ष केला, न्यायालयीन लढाया लढल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी देखील त्यांचा सातत्याने पाठपुरावा होता. मला ज्या ज्या वेळी ते भेटायचे त्या वेळी ते मराठी समाजाचा आणि स्मारकाच्या विषयी चर्चा करायचे. त्यांच्या जाण्याने म्हणजे मराठा समाजाला फार मोठा धक्का बसला आहे. परंतु त्यांचे जे उद्दिष्ट होत ते आम्ही सगळेजण मिळून मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करू असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in