कळव्यात अनधिकृत इमारतींमधील फ्लॅट सील

कळव्यात अनधिकृत इमारतींमधील फ्लॅट सील

कळवा प्रभागात एकीकडे कारवाईत सातत्य दिसत असताना लोकमान्य सावरकरनगर प्रभागात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे

ठाणे : कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी कारवाईचा जोर कायम ठेवला असून, तोडकामाबरोबरच अनधिकृत इमारतींमधील फ्लॅट सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत विटावा येथे कळव्यातील सर्वाधिक अनधिकृत इमारतींची बांधकामे सुरू असून आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी कारवाईची जोरदार मोहीम उघडली आहे. विटाव्यात दाटीवाटीने इमारती उभारण्यात येत असून, शक्य असेल तेथे बांधकामे तोडण्यात येत असून, अडचणीच्या जागेत उभ्या राहिलेल्या इमारतींमधील फ्लॅट सील करण्यात येत आहेत. विटाव्यात तीन अनधिकृत इमारतींमधील सात फ्लॅट सील करण्यात आले असून, ही कारवाई पुढे देखील सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती बोरसे यांनी दिली.

केवळ दाखवण्यापुरती कारवाई

कळवा प्रभागात एकीकडे कारवाईत सातत्य दिसत असताना लोकमान्य सावरकरनगर प्रभागात अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे, कोपरी-नौपाडा आणि माजिवडे मानपाडा, मुंब्रा या भागात सातत्यपूर्ण कारवाया होताना दिसत नसल्याचे स्थानिक तक्रारदारांचे म्हणणे असून, येथे केवळ दाखवण्यापुरती कारवाई होत असून, पुन्हा बांधकामे होत आहेत. बांधकामांवर पूर्णपणे तोडक कारवाई करताना फ्लॅट आणि अन्य बांधकामे देखील सील करण्यात यावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in