पाझर तलावाच्या पाण्यावर दुभत्या जनावरांसाठी चारा; हिरव्या चाऱ्याची शेती दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

कळंब परिसरातील शेतकऱ्यांना उन्हळ्यात शेती करण्यासाठी साळोख पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे.
पाझर तलावाच्या पाण्यावर दुभत्या जनावरांसाठी चारा; हिरव्या चाऱ्याची शेती दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

कर्जत : तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १९८० च्या दशकात पाझर तलावांची निर्मिती झाली. त्यातील साळोख येथील पाझर तलावाच्या पाण्यावर दुभत्या जनावरांसाठी महत्वाचा असलेला हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेती केली आहे. बाजारात हा चारा पाच रुपये किलो दराने विकला जात असून, शेतकरी रज्जाक बुबेरे यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीने ही शेती केली आहे. परिसरातील शेतकरी हिरवा चारा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत.

कळंब परिसरातील शेतकऱ्यांना उन्हळ्यात शेती करण्यासाठी साळोख पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. या पाझर तलावातील पाणी पावसाळा संपला की, शेतीसाठी सोडले जाते. १५ एकर जमिनीवर पाण्याचा साठा असलेल्या या तलावाच्या पाण्यावर साळोख ग्रामपंचायतीमधील असंख्य शेतकरी भाताची तसेच भाजीपाला शेती तसेच वीटभट्टी व्यवसाय करीत असतात. या सर्वांसाठी एप्रिल महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध होत असते. त्यामुळे या ग्रामपंचायतीमधील नारळेवाडी, फोडेवाडी येथील शेतकरी साळोख परिसरातील शेत जमिनीवर शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. त्याच माध्यमातून नारळेवाडी येथील शेतकरी यांनी रज्जाक बुबेरे यांच्या तीन एकर शेतामध्ये हिरव्या चाऱ्याची शेती केलेली आहे. मका जातीचे बियाणे यांची पेरणी करून त्या शेतीला दररोज पाणी देण्याचे काम केल्यानंतर आता त्यांच्या शेतात हिरवा चारा फुलून आला आहे. बुबेरे यांच्या शेताच्या बाजूने साळोख पाझर तलावातील पाण्याचा कालवा आहे. त्याच कालव्यातून पाणी उचलून शेतकरी शेती करीत आहेत.

दुभत्या गायी आणि म्हशी यांच्यामधील दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी हिरवा चारा महत्वाची भूमिका बजावत असल्याने गेल्या काही वर्षात शेतकरी हिरव्या चाऱ्याची शेती करीत असतात. सध्या हा हिरवा चार पाच रुपये किलो दराने विकला जात असून, आदिवासी शेतकरी यांचा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुरू केलेला प्रयत्न चांगला असल्याची प्रतिक्रिया तेथील ग्रामस्थ अनिस बुबेरे यांनी व्यक्त केली आहे.

तीन एकर जमिनीवर शेती

हिरव्या चाऱ्याचा बहर त्या ठिकाणी असून, साधारण तीन एकर जमिनीवर ही शेती केली आहे. उन्हाळ्यात कुठेही हिरवा चारा उपलब्ध नसतो आणि त्यामुळे हिरव्या चाऱ्याची शेती दूध व्यवसाय करणारे यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. त्याचवेळी अशी शेती करणारे शेतकरी यांच्यासाठीदेखील ही शेती फायदेशीर ठरत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in