रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी,९५६ कोटी रुपये किमतीचे रेल्वे प्रकल्प

कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि तुर्भे येथील गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म्स आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारीत प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ राष्ट्राला समर्पित केले.
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वेIndian Railway
Published on

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि तुर्भे येथील गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म्स आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील विस्तारीत प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ राष्ट्राला समर्पित केले. हे प्रकल्प सुमारे ९५६ कोटी रुपयांचे आहेत.

कल्याण यार्ड रिमॉडेलिंगची पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पाची किंमत ८१३ कोटी रुपये आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतुकीचे पृथक्करण करण्यात मदत होईल. तसेच गुड्स यार्डच्या एकीकरणामुळे कार्यक्षमतेत सुधारणा होऊन दररोज लाखो प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे रिमॉडेलिंगमुळे अधिक गाड्या हाताळण्यासाठी यार्डची क्षमता वाढून ट्रेनचा वक्तशीरपणा सुधारेल, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे.

तसेच तुर्भे येथे गतिशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनलची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. हा प्रकल्प २६.८० कोटी रुपयांचा असून तो ३२ हजार ६२८ चौरस मीटर क्षेत्रफळात व्यापलेला आहे. या प्रकल्पाद्वारे पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल. ज्यामध्ये बॅलास्ट साइडिंग लाइनचा १८० मीटर विस्तार करणे, अर्ध्या रेक लांबीच्या नवीन हँडलिंग लाइनची तरतूद, काँक्रीट रेल लेव्हल आयलँड प्लॅटफॉर्म, काँक्रीट ॲप्रोच रोड आणि सुमारे ९,७८८ चौरस मीटर पक्क्या स्टॅकिंग क्षेत्राची तरतूद समाविष्ट आहे.

या प्रकल्पामुळे स्थानिक लोकांना अतिरिक्त रोजगाराच्या संधी मिळतील, मालवाहतुकीतून महसुलात वाढ होईल. मुंबईच्या विकासासाठी सिमेंट आणि इतर वस्तूंच्या हाताळणीसाठी एक अतिरिक्त टर्मिनल निर्माण होणार आहे.

सीएसएमटी येथील विस्तारीत प्लॅटफॉर्म क्रमांक १० आणि ११ खुले

या प्रकल्पाची किंमत ५२ कोटी असून हा प्रकल्प जून २०२४ मध्ये पूर्ण झाला. कव्हर शेड आणि वॉशेबल ॲप्रनसह प्लॅटफॉर्म ३८२ मीटरने वाढविण्यात आले. या प्रकल्पामुळे २४ डब्यांपर्यंत गाड्यांचे परिचालन केले जाईल. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म्स खुले

या प्रकल्पाची किंमत ६४ कोटी असून, तो नुकताच पूर्ण झाला आहे. यामध्ये कव्हर शेड आणि वॉशेबल ॲप्रनसह ६०० मीटरच्या नवीन पूर्ण लांबीच्या प्लॅटफॉर्मचा तसेच ६ मीटर रुंदीचा फूट ओव्हर ब्रिजच्या विस्ताराचा समावेश आहे. यामुळे अधिक लांबीचे प्लॅटफॉर्म जास्त लांबीच्या गाड्या सामावून घेऊ शकतील. ज्यामुळे प्रति ट्रेन अधिक प्रवासी येऊ-जाऊ शकतात आणि वाढलेली ट्रॅफिक हाताळण्यासाठी स्टेशनची क्षमता सुधारणार आहे. तर विस्तारीत प्लॅटफॉर्म प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अधिक जागा प्रदान करून गर्दी कमी करण्यास मदत करतील.

logo
marathi.freepressjournal.in