भिवंडी : ओव्हरटेकवरून चौघांकडून कारचालकाला मारहाण केल्याची घटना भिवंडीत घडली आहे. डोंबिवली येथील दाम्पत्य कारने मुंबई-नाशिक वाहिनीवरून घरच्या दिशेने जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या थार कारचालकांना ओव्हरटेक करू न दिल्याच्या रागातून चौघांनी आपसात संगनमत करून दमदाटीने दाम्पत्याच्या कारची तोडफोड करीत कारच्या नुकसानीसह चालकाला मारहाण केल्याची संतापजनक घटना भिवंडीतून समोर आली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ राजेंद्र भोईर (२१), अनिकेत बारकू पाटील (२१), प्रेमनाथ करसन केणी (२२), प्रसाद सुरेश शेलार (२० सर्व रा.भिवंडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक अभिषेक राजेशकुमार सोई हे २२ जानेवारी रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीसह नेक्सोन कारने मुंबई-नाशिक वाहिनीवरून डोंबिवली येथील राहत्या घरी जाण्यास निघाले होते. दरम्यान, ते ओवळी हद्दीतील मिनी पंजाब ग्रील हॉटेलसमोर आले असता, त्यांच्या पाठीमागून आलेल्या थार कारने आलेल्या आरोपींनी अप्पर डिप्पर देत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी दाम्पत्याच्या कार समोरून ट्रक जात असल्याने त्यांना आरोपींच्या थारला ओव्हरटेक करू देणे शक्य झाले नाही. त्यामुळे याच गोष्टीचा राग मनात धरून चौघांनी संगणमताने गाडी दाम्पत्याच्या कारसमोर आडवी घातली.
त्यानंतर आरोपींनी दाम्पत्य कारमध्ये असतानाच त्यांना शिवीगाळ करीत कारची तोडफोड केली. त्यामुळे भीतीने दाम्पत्याने कार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता, चौघांनी पुन्हा पाठलाग करून दाम्पत्याचा रस्ता अडवून कारच्या काचा, हेडलाईट, आरसे फोडून बेस बॉलच्या अल्युमिनियमच्या दांड्याने अभिषेकच्या डाव्या हातावर मारून त्यास जखमी केले. याप्रकरणी विविध कलमान्वये चौघांवर नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि विजय कोळी करीत आहेत.