
कर्जत : नेरळ पूर्व परिसरात बदलापूर येथून आलेल्या एका चार वर्षीय चिमुरड्याचा जलतरण तलावात पडून मृत्यू झाला. आयांश अभिजित निवाळकर असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून तो आपल्या आई सोबत फिरण्यासाठी नेरळ येथे आला होता. सायंकाळी चारच्या सुमारास आयांश हा आपल्या आईचे लक्ष चुकवून हा जलतरण तलावाजवळ गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बदलापूर (पश्चिम) जवळील शनी मंदिर परिसरातील मनोहर निवास इमारतीत राहणारे निवाळकर हे चार वर्षीय आयांश मुलगा आणि आई असे फिरण्यासाठी मैत्रिणींसोबत सकाळी नेरळ येथे आले होते. निवाळकर आणि त्यांच्या मैत्रिणी नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील आशीर्वाद व्हीला या फार्महाऊस वरील बंगल्यात मुक्कामाला राहिले होते. त्यांच्यासोबत त्यांची लहान मुले देखील होती.
या पाच महिला आणि एक पुरुष त्याचसोबत लहान पाच मुले असा हा ग्रुप होता. दुपारचे जेवण करून या महिला बंगल्याच्या टेरेसवर गप्पागोष्टी करण्यासाठी बसले असताना लहान मुले बाजूला खेळत होती. यावेळी निवाळकर यांचा चार वर्षीय मुलगा आयांश आईची नजर चुकवत स्विमिंगपूल जवळ गेला असता तो पाण्यात पडला. सुमारे १५ मिनिटे हा मुलगा पाण्यात पडून होता. पाण्यातून बाहेर काढून आयांशला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपस्थित डॉक्टरांनी त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याचे यावेळी सांगितले.