भाईंदर : भाईंदर पूर्वेला नवघर पोलीस ठाणे हद्दीत चार वर्षीय चिमुरडीवर एका ४५ वर्षीय चिकन दुकानदाराने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला पोलिसांनी अटक केली. परंतु रविवारी रात्री पोलीस ठाण्यात जमलेल्या जमावाने आरोपीला आमच्या ताब्यात द्या, असे सांगत गोंधळ घातला व परिसरातील विशिष्ट धर्मीयांची काही दुकाने लक्ष्य करत तोडफोड केली.
साडेतीन ते चार वर्ष वयाची चिमुरडीवरील ७ एप्रिलच्या घडलेल्या अत्याचाराची माहिती रविवारी काही संघटनांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला पकडून मारहाण करत त्याच्या दुकानाची तोडफोड केली व त्याला नवघर पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. परंतु बजरंग दल व अन्य कार्यकर्त्यांचा जमाव रात्री पोलीस ठाण्यात जमून होता. जमावाने घोषणाबाजी करत आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी चालवली. नवघर पोलीस ठाण्यात स्वतः पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक, भाजप प्रवक्ता शैलेश पांडेय आदींनी रात्री जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमाव ऐकत नव्हता तसेच परिसरातील काही दुकानांची त्यांनी तोडफोड केली. यामुळे पोलिसांनी जमावाला हुसकावून लावण्यासाठी लाठीचा बडगा उगारला.
पोलीस कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असताना तसेच शहरातील दोन समाजामध्ये तेढ निर्माण काम काही संघटना मीरा-भाईंदर शहरात वारंवार करत आहेत. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, आचारसंहिता असतानाही काही जण जाणीवपूर्वक तणावपूर्ण माहौल बनविण्याचे काम करत आहेत व तसेच सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल करून विनाकारण शांतता खराब करत आहेत, असा संताप जागरूक नागरिक करीत आहेत.