परराज्यातील ‘बोगस’ डॉक्टरांचा पर्दाफाश; उल्हासनगर महापालिकेची कारवाई

उल्हासनगरमध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या मुखवट्याआड चालणाऱ्या एका भयंकर वास्तवाचा उलगडा झाला आहे. बोगस डिग्री, बनावट परवाने आणि परराज्यातून आलेले ‘डॉक्टर’ शहरात निर्धास्तपणे क्लिनिक चालवत होते.
परराज्यातील ‘बोगस’ डॉक्टरांचा पर्दाफाश; उल्हासनगर महापालिकेची कारवाई
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या मुखवट्याआड चालणाऱ्या एका भयंकर वास्तवाचा उलगडा झाला आहे. बोगस डिग्री, बनावट परवाने आणि परराज्यातून आलेले ‘डॉक्टर’ शहरात निर्धास्तपणे क्लिनिक चालवत होते. या धक्कादायक खुलाशानंतर उल्हासनगर महापालिकेने तत्काळ कारवाई करत या बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश करत त्यांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी सर्वाधिक परराज्यातील असून, त्यांच्या चुकीच्या उपचारामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले होते.

‘डॉक्टर’ या विश्वासाच्या शब्दाला काळीमा फासणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात उल्हासनगर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने विशेष तपासणी करत तब्बल २६ डॉक्टरांची संशयित यादी तयार केली. या तपासणीतून समोर आलेली सर्वात गंभीर बाब म्हणजे, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १८ बोगस डॉक्टरांपैकी बहुतांश डॉक्टर परराज्यातील आहेत. त्यांनी कोणतीही वैध वैद्यकीय पात्रता नसतानाही उल्हासनगरमध्ये क्लिनिक उभारून नागरिकांवर उपचार केल्याचे उघड झाले आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा आणि त्यांच्या पथकाने तातडीने तपासणी केली आणि संबंधित डॉक्टरांविरोधात पोलीस विभागात गुन्हे दाखल करण्यात आले.

सजग राहा, फसवणूक टाळा - महानगरपालिकेचे आवाहन

महापालिकेच्या वतीने नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की, अवैध डॉक्टरांकडून उपचार घेऊ नयेत. संशयास्पद क्लिनिकबाबत प्रशासनाला तत्काळ कळवावे. वैध व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनी आपली नोंदणी व परवाने अद्ययावत ठेवावेत.

logo
marathi.freepressjournal.in