प्रतिनिधी/ठाणे
मुलांना खेळण्यासाठी शहरात मैदानेच उरली नसताना आता ठाणे महापालिकेचे अतिशय जुने गावंदेवी मैदान देखील खासगी संस्थांना आंदण दिले असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन खासगी संस्थांच्या माध्यमातून करण्यातून येत असल्याने गावंदेवी मैदान मुलांना खेळण्यासाठी उपलब्धच होत नसल्याने क्रीडाप्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे महापालिकेने गावदेवी मैदानाचा व्यावसायिक वापर थांबवावा अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकत्यांनी दिला आहे.
शहरातील पार्किंगची जटिल समस्या सुटावी यासाठी पालिकेचेच्या वतीने विविध ठिकाणी पार्किंगचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये गावंदेवी येथील भूमिगत पार्किंगचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात असून, ७०० चौरस मीटरवर हे बांधकाम करण्यात आले आहे. त्यानुसार याठिकाणी १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत. या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी शुल्क आकारण्यात येत असून, हे काम देखील एका खास गी संस्थेला देण्यात आले आहे. भूमिगत पार्किंगसाठी २७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. याशिवाय ठाणेकरांना या ठिकाणी रात्रीचे पार्कीग देखील करता येणार आहे. भूमिगत पार्किंगचा प्रकल्प राबवण्यापूर्वी केवळ खेळाचे मैदान असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्रीडाप्रेमी खेळायला येत होते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अतिशय जुने असे हे मैदान असून, पार्किंग प्रकल्पामुळे मैदानाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि क्रीडाप्रेमींनी ठाणे महापालिकेकडे केली होती. त्यानुसारच हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. एकीकडे भूमिगत पार्कीगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, दुसरीकडे मैदानही पूर्वीप्रमाणे क्रीडाप्रेमींसाठी खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी मातीचा भराव टाकून पूर्वी सारखे मैदान खेळण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे.
मुलांनी खेळायचे कधी?
मैदान क्रीडाप्रेमींसाठी खुले करण्यात आले असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत असला, तरी या मैदानाचा जास्त वापर या खासगी संस्थाच जास्त करत असून, पालिकेने देखील हे मैदान खासगी संस्थांना आंदण दिले असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी अनेकवेळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने या मैदानात मुलांनी कधी खेळायचे असा प्रश्न मुलांना पडला आहे. हे मैदान खासगी संस्थांना भाड्याने देऊन पालिका गडगंज भाडे वसूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले असून या निवेदनात गावदेवी मैदानाचा व्यावसायिक वापर थांबवला नाही आणि हे मैदान जर क्रीडाप्रेमींना उपलब्ध करून दिले नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा डोंगरे यांनी दिला आहे.