गायकवाड गोळीबार प्रकरण: आरोपी विकी गणोत्राला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

विकी गणोत्रा हा आमदार गायकवाड यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.
गायकवाड गोळीबार प्रकरण: आरोपी विकी गणोत्राला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

उल्हासनगर : शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातील गोळीबारप्रकरणी फरार तीन आरोपींपैकी आमदार गणपत गायकवाड यांचा जवळचा पदाधिकारी असलेला दिवेश उर्फ विकी गणोत्रा याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली होती. आज विकीला उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हिललाईन पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात महेश गायकवाड याच्यावर आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार प्रकरणात रोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. मंगळवारी रात्री फरार आरोपींपैकी कल्याण पश्चिमेतील सुंदरनगर येथे राहणारा दिवेश उर्फ विकी गणोत्राला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. विकीला उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार होण्याच्या काही सेकंद अगोदर आमदार पुत्र वैभव गायकवाड आणि विकी गणोत्रा हे वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातून बाहेर गेले होते. त्यामुळे प्रमुख सहा आरोपींमध्ये त्याचाही समावेश आहे. तसेच विकी गणोत्रा हा आमदार गायकवाड यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in