

ठाणे : नवी मुंबईतील ज्येष्ठ भाजप नेते गणेश नाईक यांनी शिंदे सेनेबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात म्हस्के यांनी युतीत असतानाही शिवसेनेला संपवण्याची भाषा केली जात असल्याचा आरोप केला आहे.
पत्रानुसार, महायुती म्हणून एकत्र लढून राज्यात तसेच अनेक महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन झाली असताना, मित्रपक्षातील काही नेत्यांकडून शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य केले जात असल्याची नोंद म्हस्के यांनी केली. त्यांनी आरोप केला की, गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांतून शिवसेनेला नवी मुंबईतून संपवण्याचे आणि धोबीपछाड करण्याचे इरादे जाहीर केले आहेत.
नवी मुंबईतील राजकारणाचा उल्लेख करताना, शिवसेना नवी मुंबईत संपली आहे, अशी वल्गना करणाऱ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत उत्तर देण्यात आले, कारण शिवसेनेने तब्बल ४२ जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली आहे. यामुळे काही नेत्यांची अस्वस्थता वाढली असावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, पत्रात असेही नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्थिर, हिंदुत्ववादी सरकार चालवत आहेत, ज्याला शिवसेनेचा सक्रिय पाठिंबा आहे.
दिल्लीतील एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून आणि महाराष्ट्रात युतीचा भागीदार म्हणून शिवसेनेने सरकारच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. अखेर, म्हस्के यांनी पक्षनेतृत्वाला विनंती केली की गणेश नाईक यांच्या वक्तव्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि युतीधर्म धोक्यात येईल, असे कोणतेही वक्तव्य किंवा कृती खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट इशारा दिला आहे.
घटक पक्षाविरोधात जहाल भाषा वापरणे अयोग्य
अशा वक्तव्यांनी महायुतीच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवला जात असून, युतीतल्या मोठ्या घटक पक्षाविरोधात अशी भाषा वापरणे युतीधर्माच्या तत्त्वाविरुद्ध आहे. पत्रात त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यात भाजप आणि शिंदे सेनेची निर्णायक भूमिका राहिली आहे आणि त्यानंतर राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, मुंबईसह अनेक ठिकाणी महायुती म्हणून लढत देऊन मोठे यश मिळाले असल्याचे म्हस्के यांनी असेही नमूद केले आहे.