खुमखुमी असेल तर माझ्याविरोधात लढा; खासदार श्रीकांत शिंदे यांचे मंत्री गणेश नाईकांना आव्हान

‘विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदार संघात माजी खासदार करू’, असे वक्तव्य भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते.
खुमखुमी असेल तर माझ्याविरोधात लढा; खासदार श्रीकांत शिंदे यांचे मंत्री गणेश नाईकांना आव्हान
Published on

डोंबिवली : ‘विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदार संघात माजी खासदार करू’, असे वक्तव्य भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले होते. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे संतापले असून, ‘तुम्हाला जास्त खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा’, असे खुले आव्हान त्यांनी मंत्री नाईक यांना रविवारी दिले. महाशिवरात्रीनिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरासह डोंबिवलीतील खिडकाळेश्वर मंदिर, मानपाडेश्वर मंदिर व पिंपळेश्वर शिव मंदिरांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भेट देत महादेवाचे दर्शन घेतले.

डोंबिवलीतील पिंपळेश्वर शिवमंदिरातील शिवलिंगाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी शिवमंदिर कॉरिडॉर विकास कामाचा उल्लेख केला. देशाच्या विविध राज्यांतून भाविक हे शिवमंदिर आणि शिवमंदिर कॉरिडोर पाहण्यासाठी येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री गणेश नाईक यांचा समाचार घेताना खा. शिंदे यांनी ‘वयाच्या हिशोबाने आजार होतात. त्यात विसरभोळेपणा, चिडचिड, दिशाभूल असे विविध आजार होत असतात, हे मी सांगू शकतो. कारण मी डॉक्टर आहे’, असा टोला मंत्री गणेश नाईक यांना लगावला. त्याचबरोबर मला माजी करण्याच्या गमजा त्यांनी मारू नयेत, जर जास्तच खूमखुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघातून, कुठूनही त्यांनी किंवा त्यांच्या मुलाने निवडणूक लढवून दाखवावी, मी त्यांच्यासमोर उभा राहीन, असे आव्हानच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. जनतेने मला तीन वेळा निवडून दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे कामाने उत्तर देतात. मात्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका, असा इशारा खासदार शिंदे यांनी मंत्री गणेश नाईक यांना दिला.

logo
marathi.freepressjournal.in