ठाणे जिल्ह्याच्या वर्चस्वाच्या राजकारणात गणेश नाईकांचा पत्ता कट होणार?

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील शिंदे समर्थक आमदारही नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्याच्या वर्चस्वाच्या राजकारणात
 गणेश नाईकांचा पत्ता कट होणार?

काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात ज्या गणेश नाईक यांनी सलग दहा वर्षे पालकमंत्रिपद भूषवले,अवघ्या काही वर्षांपूर्वी त्यांचे नाव घेतल्या शिवाय जिल्ह्यातील राजकारणातले पानही हलत नव्हते त्याच गणेश नाईक यांना भाजपात असूनही मंत्रिपदापासून वंचित रहावे लागले आहे. सुरवातीला शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीतून जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले नाईक सर्वार्थाने भक्कम आहेत मात्र हेच त्यांचे वैभव त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यास कारणीभूत ठरले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नाईक पुन्हा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तर आपल्याला जड जातील या शक्यतेनेच त्यांच्याऐवजी डोंबिवलीच्या रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पसंती दिली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील शिंदे समर्थक आमदारही नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःची इच्छा नसतानाही केवळ पुत्र संदीप नाईक यांच्या आग्रहाखातर गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता. तेव्हा बेलापूर विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनाच भाजपची उमेदवारी मिळू शकते तर विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांची वर्णी विधानपरिषदेवर लागू शकते असे संकेत मिळत होते मात्र भाजपच्या पहिल्या यादीतच मंदा म्हात्रे यांना भाजपणे तिकीट जाहीर केले आणि गणेश नाईक यांचे भवितव्य भाजपात अस्थिर असल्याचे त्याचवेळी उघड झाले. नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात भाजपचे गेलेले गतवैभव परत मिळू शकते अशी चर्चा सुरु असताना मूळचे भाजपचे असलेले प्रस्थापित मात्र नाराज झाले होते तर शिवसेनेतील एक गटही पुढचे पालकमंत्री गणेश नाईक होऊ शकतात या शक्यतेने अस्वस्थ झाला होता. या सर्व विरोधकांनी एक होऊन नाईक यांच्या वाटेत काटे पेरले असल्याचे चर्चा तेव्हाच सुरु झाली होती.

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाने भाजप आणि शिवसेनेचे बरेच नेते नाराज होते, नाईकांच्या हाती नेतृत्व गेले तर आपले काही खरे नाही हे ओळखलेल्या प्रस्तापितांनी राजकीय डावपेंच आखायला सुरवातीपासूनच पासून सुरवात केली होती. दरम्यान भाजपात प्रवेश केल्या नंतर ठाण्यात झालेल्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांच्या व्याख्यानाचा पहिलाच मोठा कार्यक्रम होता .

स्वतःचा वाढदिवस असताना देखील माजी मंत्री गणेश नाईक त्या कार्यक्रमाला स्वतः आले होते मात्र मंचावर त्यांना बसायला जागाच नसल्याने त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता. त्याचवेळी गणेश नाईक यांना भाजप प्रवेश पावला नसल्या चर्चा सुरु झाली होती. मात्र स्थानिक पदाधिकार्यांना नाईक यांचा प्रवेश पचनी पडला नसला तरी एका बड्या उद्योजकाच्या माध्यमातून नाईक यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून प्रवेश घेतला असल्याने नाईक यांची राजकीय कारकीर्द भाजपात बहरणार असल्याचे सांगण्यात येत होते मात्र आता मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाईक एकटे पडले आहे.

जिल्हा वर्चस्वाच्या वादाचा नाईकांना फटका

जिह्याचे पालकमंत्रिपद पुन्हा गणेश नाईक यांच्या वाट्याला जाऊ शकते या शक्यतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटात चिंतेचे वातावरण होते. विशेष म्हणजे सलग दहा वर्षे पालकमंत्रिपद भूषविलेल्या गणेश नाईक यांची ताकद सर्वार्थाने मोठी असल्याने त्यांना रोखण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू होते. त्यांना भाजपातील काही प्रस्थापितांचीही साथ मिळाली आणि त्यांची खेळी यशस्वी झाली अशी चर्चा आता सुरू आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील ज्या नगरसेवकांनी शिंदे यांना आपला पाठिंबा दिला होता, त्यातीलच दोन नगरसेवकांना भाजपमध्ये आणून नाईक यांनी एकनाथ शिंदे याना झटका दिला होता.

शिंदे समर्थक आमदारांना स्थान नाही

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला ठाणे पालघर जिल्ह्यातील सर्वच शिवसेना आमदारांनी पाठिंबा दिला होता त्यातील प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर यापैकी एकाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र कुणालाही पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे शिंदे समर्थक आमदारही नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in