डोंबिवली : दहशत माजविण्यासाठी कोयता घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडास बेड्या ठोकून अटक करण्यास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. या गुंडास कल्याण-डोंबिवली परिमंडल-३ मधून ६ जून २०२३ पासून १८ महिन्यांकरिता हद्दपार (तडीपार) केले होते. घातक शास्त्राने वार करून दहशत माजवणे असे तीन गुन्हे तसेच एनडीपीएसचा एक गुन्हा असे एकूण चार गुन्हे डोंबिवली पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तसेच डोंबिवली पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करून ताब्यात देण्यात आले आहे.
कल्याण क्राईम ब्रँचचे युनिट-३चे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तडीपार केलेला गुंड सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते हा डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर प्रगती कॉलेजच्या समोर गार्डनजवळ धारदार भलामोठा कोयता घेऊन फिरत आहे. कल्याण क्राइम युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सपोनि संतोष उगलमुगले, पोउनि संजय माळी, पोह. दत्ताराम भोसले, विश्वास माने, बालाजी शिंदे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग यांनी तडीपार गुंड सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते आला असताना पाठलाग करून त्यास घातक हत्यार कोयत्यासह पकडले.