

मुंबई : उल्हासनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना मंगळवारी उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी गणपत गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यात जामीन मंजूर केल्यास कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, या तत्त्वाला धक्का बसेल, असे न्यायमूर्ती बोरकर यांनी जामीन नाकारताना स्पष्ट केले.
उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे कल्याण अध्यक्ष महेश गायकवाड आणि इतर दोघे वरिष्ठ पोलिस निरीक्षक (पीआय) अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये बसले होते.
त्यावेळी गणपत गायकवाड व त्यांचे सहकारी केबिनमध्ये घुसले आणि महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. महेश गायकवाड यांच्या शरीरात सात गोळ्या घुसल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचा अंगरक्षक हर्षल केणे, कुणाल पाटील आणि नागेश बडेराव यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. तथापि न्यायालयाने आरोपींना जामीन नाकारला.