‘गन’पत गायकवाड यांच्याकडे २०१७ पासून बंदूक परवाना, गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर फॉरेन्सिक लॅबकडे

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा पूर्वीपासून तिसाई केबल या नावाने व्यवसाय आहे. त्यांना स्वयंघोषित अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याने ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते.
‘गन’पत गायकवाड यांच्याकडे २०१७ पासून बंदूक परवाना, गुन्ह्यात वापरलेले रिव्हॉल्व्हर फॉरेन्सिक लॅबकडे

उल्हासनगर : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांचा पूर्वीपासून तिसाई केबल या नावाने व्यवसाय आहे. त्यांना स्वयंघोषित अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारी याने ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावले होते. हा प्रकार २०१७ या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडला होता. तेव्हापासून आमदार गायकवाड यांच्याकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे. या परवान्याच्या आधारावर त्यांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर बाळगले होते. एकीकडे या रिव्हॉल्व्हरने त्यांनी प्रतिस्पर्धी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. यात महेश गायकवाड जायबंदी झाले. तर दुसरीकडे पोलिसांनी जप्त केलेले रिव्हॉल्वर तपासणीकरिता फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्याची पोलीस सुत्रांनी दिली.

केबल व्यवसायिक आमदार गणपत गायकवाड यांना १५ नोव्हेंबर २०१७ रोजी गुंड सुरेश पुजारी याचा पहिला फोन आला होता. त्यानंतर दुसरा फोन १७ नोव्हेंबर रोजी आला. त्यावेळी त्याने आमदार गायकवाड यांच्याकडे ५० लाखांची खंडणी मागितली. खंडणीची रक्कम न दिल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. आमदार गायकवाड यांनी त्यावेळी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली होती. आयुक्तांच्या सूचनेनुसार आमदार गायकवाड खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार करण्यास गेले. खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना भेटण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमदार गायकवाड यांना वाईट अनुभव आला होता.

लोकप्रतिनिधीच्या तक्रारीची दखल पोलीस घेणार नसतील, तर सर्व सामान्यांची काय अवस्था होईल, असा सवाल करत गायकवाड यांनी पोलिसांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. गृह खात्याने आमदार गणपत गायकवाड यांना अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना दिला.

ठाणे गुन्हे शाखेकडून तपासाला वेग

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ल्याच्या तपासाला सोमवारी आणखी वेग आला आहे. गुन्हे शाखेच्या चार तपास पथकांनी सोमवारी सकाळी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेज तसेच ज्या जमिनीच्या वादातून हा प्रकार घडला त्या द्वारली येथील जागेचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तपास पथकाकडून पाहणी करण्यात आली. तसेच इतर फरार तीन आरोपींचा शोध घेण्यासाठीही पोलिसांनी आपली यंत्रणा सक्रिय केली आहे.

द्वारली येथील एका जमिनीच्या वादातून आणि शिवसेना भाजपामधील स्थानिक राजकारणातील पूर्ववैमनस्यातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनातच अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. अटक तीन आरोपीसह आमदार गणपत गायकवाड यांना सुरक्षेच्या कारणास्तव कळवा येथे ११ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर जखमी महेश गायकवाड हे सोमवारी शुद्धीवर आल्याचे समोर आले आहे. सोमवारी गुन्हे शाखेची चार पथके उल्हासनगर शहरात सकाळी दाखल झाली होती.

यावेळी गुन्हा घडलेल्या हिललाईन पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची संध्याकाळपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सखोल पाहणी करण्यात येत होती. गुन्हा घडला त्यावेळी नेमके किती लोक या ठिकाणी उपस्थित होते. त्यात दोन्ही गटातील किती आणि कोण कोण उपस्थित होते. याबाबत पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in