ठाण्यातील कचराकोंडी फुटणार! कचरा भिवंडीत जाणार; डम्पिंगसाठी नवीन जागा

स्वच्छ, सुंदर ठाणे अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ठाणे महापालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे कचऱ्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. कचरा निर्मूलनाचे पालिकेचे अनेक पर्याय आतापर्यंत फसले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : डायघरमधील डम्पिंग ग्राऊंडवर अजूनही केवळ ५०० मेट्रिक टन कचरा टाकला जात असून दुसरीकडे सीपी तलावची क्षमता देखील संपत आली असल्याने आता ही कचराकोंडी फोडण्यासाठी ठाणे महापालिकेने डम्पिंगसाठी नवीन जागा शोधली आहे. भिवंडी-पडघानजीक शासनाच्या मालकीची असलेली ८५ एकर जमीन डम्पिंगसाठी देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या जमिनीचे सर्वेक्षण, मोजणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध परवानग्या मिळाव्या, यासाठी पालिका प्रशासनाने धावपळ सुरू केली आहे. डायघरमध्ये प्रक्रिया न होणार कचरा या ठिकाणी टाकला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात येत असली तरी कचराकोंडीवरून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी कचरा विल्हेवाटीसाठी आणखी एक पर्याय पालिका प्रशासनाकडून शोधला जात असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

स्वच्छ, सुंदर ठाणे अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ठाणे महापालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून पूर्णपणे कचऱ्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. कचरा निर्मूलनाचे पालिकेचे अनेक पर्याय आतापर्यंत फसले आहेत. भांडर्लीचे डम्पिंग बंद झाल्यानंतर डायघर येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा करण्यात येत होती. मात्र अजूनही हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नसून या ठिकाणी केवळ ५०० मेट्रिक टन कचरा टाकून त्यावर प्रक्रिया केली जात आहे. अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अडचणी येतात. तर सीपी तलाव या ठिकाणी कधी कधी कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्याने ठाण्यात कचराकोंडीची समस्या निर्माण होत असते. नुकताच असा प्रकार घडल्याने पालिका प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

परवानग्या मिळवण्यासाठी प्रशासनाची लगबग

शहरात कचराकोंडीची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेने आता भिवंडी येथील शासनाच्या जागेचा पर्याय शोधला आहे. या ठिकाणी शासनाच्या मालकीची ८५ एकर जमीन असून ही जमीन ठाणे महापालिकेला देण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे हे डम्पिंग लवकरात लवकर कशाप्रकारे सुरू करता येईल, यासाठी पालिकेची धावपळ सुरू केली असून जमिनीचे सर्वेक्षण तसेच मोजणी करून प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध परवानग्या मिळाव्या यासाठी प्रशासनाची लगबग सुरू केली आहे.

प्रस्तावित प्रकल्प...

गायमुख येथे १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली असून सप्टेंबरपर्यंत हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या ठिकाणी होते कचऱ्यावर प्रक्रिया

शहरात एकूण निर्माण होणारा कचरा १००० मेट्रिक टन

डायघर ५०० मेट्रिक टन

हिरानंदानी इस्टेट ३५ मेट्रिक टन

कोलशेत २५ मेट्रिक टन

कळवा २५ मेट्रिक टन

मुंब्रा कौसा १० मेट्रिक टन

ऋतु पार्क १० मेट्रिक टन

logo
marathi.freepressjournal.in