ठाणे : कळवा-मुंब्रा-दिवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग साचू लागले असून वेळेवर कचरा न उचलल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवरून सोमवारी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलनही झाले. मात्र हा कचरा सतत साचत राहण्यामागचं मूळ कारण आता समोर आले आहे. डायघर येथील रहिवाशांनी डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास ठाम विरोध सुरू केला आहे.
डायघर प्रकल्पस्थळी एकही कचऱ्याची गाडी जाऊ न देण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतल्यामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील कचरा प्रचंड प्रमाणात साचू लागला आहे. महापालिकेकडून कचरा वाहतुकीसाठी दररोज जाणारी ४० ते ५० वाहने पाच दिवसांपासून अडवली जात आहेत. पाच-सहा दिवसांपासून कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कचरा उचलला न गेल्याने सोमवारी शरद पवार गटाने महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. या तीन भागांतून रोज सुमारे ३०० मेट्रिक टन कचरा डायघरमध्ये नेला जात होता.
डायघरमध्ये विरोध वाढत असल्याने महापालिकेने मंगळवारपासून या भागातील कचरा थेट भिवंडीतील आतकोली डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ठाणे, वागळे इस्टेट आणि घोडबंदर भागातील कचरा आतकोली येथेच टाकला जातो. त्यात कळवा-मुंब्रा-दिवा क्षेत्राचा कचरा जोडल्याने आतकोलीवरील ताण आणखी वाढणार आहे. पाच-सहा दिवसांपासून कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील कचरा उचलला न गेल्याने सोमवारी शरद पवार गटाने महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन करत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला. या तीन भागांतून रोज सुमारे ३०० मेट्रिक टन कचरा डायघरमध्ये नेला जात होता.
१४-१५ वर्षांपासून प्रकल्पाचा फक्त कागदी पाठपुरावा
डायघर येथे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याची घोषणा जवळपास १४–१५ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प आजपर्यंत कार्यान्वित झालेला नाही. या अपुऱ्या व अपूर्ण प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी, आरोग्य धोका आणि प्रदूषणामुळे नाराज ग्रामस्थांनी निवडणुकीच्या तोंडावर तीव्र आंदोलन छेडले आहे.
नगरसेवक-पालिका प्रशासन अडचणीत
डायघर प्रकल्पास स्थानिकांचा विरोध कायम असल्याने महापालिका प्रशासन ग्रामस्थांशी चर्चा करत आहे. मात्र प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे आणि आश्वासनांवरच काम अडकत असल्यामुळे ग्रामस्थांनी आपली भूमिका कठोर केली आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला असून पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.