
नितीन बोंबाडे/पालघर
पालघर-ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समाजात गवूरपूजनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतीची कामे संपल्यावर थकव्याला विराम देत महिलावर्ग, तरुण-तरुणी उत्साहाने या सणाची तयारी करतात. गवूर मातेचे पूजन हे निसर्गाशी जोडलेले एक अनोखे पूजन मानले जाते. हा सण पारंपरिक कला, निसर्गपूजन आणि सामूहिक उत्साह यांचा सुंदर संगम असल्याने आदिवासी समाजात तो आजही तितक्याच श्रद्धेने साजरा होतो.
गवूर पूजनाच्या आदल्या दिवशी गवूर घराबाहेर आणला जातो. गवूर आणणाऱ्याच्या कानात सौवाशिण फुल अडकवते. पूजनाच्या दिवशी गवूर मातेची प्रतिकृती पाट, खुर्ची किंवा बाकावर बसवून रानफुलांनी सजवली जाते. पूजनापूर्वी घर स्वच्छ करून तांबड्या मातीने पट्टा मारला जातो. त्यावर तांदळाच्या पिठाचे हाताचे ठसे, बोटांचे ठसे व पावलांचे ठसे उमटवून संपूर्ण घर सजवले जाते. कुंकू-हळदीच्या ठशांनी ही चालवण सुवासिनी करतात. सासूपासून सुनेपर्यंत चालत आलेली ही परंपरा आजही जपली जाते.
रानफुलांची आरास व तयारी
गवूर पूजनात इंदई (Glory Lily), दिंडेची पाने, गायगोजी, गोहिल्या, गोमेठीचा ताना, दौडे, पेवे, तेरडा, करडू आदी रानफुलांचा उपयोग करून गवूरची सजावट केली जाते. पानाफुलांनी सजवलेल्या गौराय मातेभोवती नऊवारी साडी, नथ, मंगळसूत्र, बांगड्या असे दागिने घालून सुवासिनी देवीला सौभाग्यवतीचे रूप देतात.
गवूरी चालवणे
गवूर मातेचे आगमन संध्याकाळी केले जाते. घराच्या ओट्यावरून आतपर्यंत पावलांची सजावट केली जाते. कुंकू-हळदीच्या ठशांनी देवीच्या पावलांची चालवण सुवासिनी करतात. दुसऱ्या दिवशी सुवासिनी मोठ्या संख्येने जमून गवूर मातेला शेतामध्ये वा वाहत्या पाण्यात निरोप देतात. त्या वेळी महिलावर्गाचा मोठा मेळावा भरतो आणि गवूरी गीतांच्या जल्लोषात देवीला निरोप दिला जातो.
वारली समाजाची पाठ
वारली समाजात मात्र गवूर बसवण्याची परंपरा नाही. 'वाघाने आमची गवूर खाल्ली' या आख्यायिकेमुळे ते गवूरपूजन करत नाहीत, असे सांगितले जाते. आदिवासी समाजात इंदई (Glory Lily) या वनस्पतीला गवूर मातेचे पवित्र रूप मानून पूजन केले जाते. सोबतच डिनेची पाने, पेवा, ठेरडा, गोमेठी, गयगव्हाऱ्या यांसारख्या औषधी वनस्पतींचेही सन्मानपूर्वक पूजन केले जाते.