१५ ऑगस्टपूर्वी वाजणार गडकरी रंगायतनची तिसरी घंटा

दीड वर्षापासून दुरुस्तीसाठी बंद असलेले गडकरी रंगायतन नाट्यगृह सुरू करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. १५ ऑगस्टपूर्वी रंगायतनची तिसरी घंटा वाजेल, असे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
१५ ऑगस्टपूर्वी वाजणार गडकरी रंगायतनची तिसरी घंटा
Published on

ठाणे : दीड वर्षापासून दुरुस्तीसाठी बंद असलेले गडकरी रंगायतन नाट्यगृह सुरू करण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. १५ ऑगस्टपूर्वी रंगायतनची तिसरी घंटा वाजेल, असे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

राम गणेश गडकरी रंगायतनची दुरुस्ती करताना, त्या वास्तूला आधुनिकतेचा साज देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे. यावेळी विशेषत: नाट्य रसिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. जवळपास दीड वर्षे दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेले ठाण्याचे वैभव असलेले हे रंगायतन अखेर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील महिन्यात १५ ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वीच या नाट्यगृहाची पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

याशिवाय खिडक्यांची संख्या वाढवून ती संख्या ६ वर नेण्यात आली आहे. तसेच रंगायतनाच्या पृष्ठभागावरील नवीन रंग छटा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर मागील महिनाभर येथील वातानुकूलित यंत्रणेचे काम सुरू होते. येथे येणाऱ्या रसिकांना अगदी गारव्यात शांतपणे नाटकाचा मनमुराद आनंद घेता यावा, या दृष्टीने वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर याची ट्रायल घेतली जाणार आहे.

४७ वर्षांनी नाट्यगृहाचा पडदा बदलणार

गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना रंगायतनचे पारंपरिकपण जपले गेले आहे. तसेच, काळानुरूप अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यानुसार याशिवाय ज्येष्ठ रसिकांसाठी या ठिकाणी लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच खालील बाजूस आणखी दोन टॉयलेट वाढविण्यात आले. त्याचबरोबर अत्याधुनिक स्वरूपाचे स्पीकर बसविले जाणार आहेत. त्याचबरोबर गडकरी रंगायतनचा पडदा हा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तोही ४७ वर्षांनी बदलण्यात आला आहे.

आसन क्षमतेत घट

मासुंदा तलावाच्या काठावर १९७८ मध्ये राम गणेश गडकरी रंगायतन बांधण्यात आले होते. तसेच रंगायतनची २००५ मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केली गेली. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी नूतनीकरण केले जात आहे. रंगायतनची आसन क्षमता १ हजार ८० एवढी आहे. पूर्वी आखूड खुर्च्या होत्या. हाच मुद्दा लक्षात घेऊन आता येथे आरामदायी खुर्च्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आसन क्षमता १२० ने कमी झाली असून ती आता ९६० पर्यंत आलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in