अयोध्येतील भाविकांसाठी ठाण्यातून जेनेरिक औषधे विनामूल्य; औषधांचे ट्रक बुधवारी रवाना

अयोध्येतील भाविकांसाठी ठाण्यातून जेनेरिक औषधे विनामूल्य; औषधांचे ट्रक बुधवारी रवाना

सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
Published on

ठाणे : अयोध्या नगरीमध्ये २२ जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यास देशभरातून लाखो रामभक्त तसेच भाविक उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येने या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली जेनेरिक आधारची ट्रक भरून औषधे बुधवारी अयोध्या नगरीकडे रवाना झाली आहेत.

सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरज लागू शकते. भाविकांना योग्य वेळी औषधे मिळावीत, त्याची उणीवा भासू नये यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टतर्फे फार्मा कंपनी ‘जेनेरिक आधार’ ला औषधे पुरवठा करण्यास निवेदन आले आहे. याचा स्वीकार करीत २१ वर्षीय युवा उद्योजक, जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्यात बुधवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथे विनामूल्य औषधे रवाना करण्यात आली आहेत. अयोध्येला पाठवण्यात येणाऱ्या या विनामूल्य औषधांमध्ये पॅरासिटामोल ६५० (तापासाठी), डायक्लोफेनॅक लिन्सीड ऑइल जेल (वेदनाशामक), लेवोसिटीरिझाईन (अँटी ॲलर्जी), अजिथ्रोमाइसिन (एंटीबायोटिक), मेटफॉर्मिन (अँटी डायबेटीक), टेलमिसर्टन (हृदय रोग), अमलोदीपिन (उच्च रक्तदाब), मल्टिव्हिटॅमिन कॅप्सूल्स तसेच पँटोप्राझोल डोंपेरीडॉन (ॲसिडिटी) सारख्या औषधांचा समावेश आहे.

मकर संक्रांतीपासून ते फेब्रुवारी महिना अखेरपर्यंत पन्नास लाख श्रद्धाळू अयोध्या नगरीमध्ये येऊ शकतात. अयोध्या नगरी हे एक छोटेसे शहर असून या नगरीमध्ये तब्बल ३००० मंदिरे आहेत. प्रवासाचा थकवा, हवामानातील बदल, कडाक्याची थंडी आणि खाण्यापिण्यातील बदलामुळे भाविकांना आजारपण येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत औषधांची गरज भासू शकते.

logo
marathi.freepressjournal.in