

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेटट्रेन प्रकल्पांतर्गत ठाणे खाडीखालून ७ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. घणसोली येथून विक्रोळीच्या दिशेने भुयारीकरणाचे काम शनिवारी सुरू झाले. हा बोगदा देशातील पहिला पाण्याखालील बोगदा ठरणार आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सावली (घणसोली) येथून विक्रोळीच्या दिशेने दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) शनिवारपासून भुयारीकरणाचे काम सुरू झाले. एकूण १० किलोमीटर अंतरापैकी ७ किलो मीटरचा भाग ठाणे खाडीखालील असणार आहे. या प्रकल्पाच्या एकूण २१ किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईतील सावली (घणसोली) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा १६ किमीचा भाग टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून तयार केला जाणार आहे. पहिल्या टीबीएमने ५ जुलै २०२६ रोजी विक्रोळीकडून बीकेसीच्या दिशेने ६ किमीची मोहीम आधीच सुरू केली आहे. उर्वरित ५ किमीचा भाग एनएटीएम पद्धतीने आधीच पूर्ण झाला आहे.
हे टीबीएम भारतातील रेल्वे बोगदा बांधणीसाठी आतापर्यंत वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आहे. यामध्ये १३.६ मीटर व्यासाचे (एका 4 मजली इमारतीच्या उंची इतके) एक अवाढव्य कटरहेड आहे, त्याचे वजन 3,200 टन (५०० आशियाई हत्तींच्या वजनाइतके) आहे. त्याची एकूण लांबी ९६ मीटर (१०५ मीटरच्या फुटबॉल मैदानाशी तुलना करण्यायोग्य) आहे.
या मशीनमध्ये कटर व्हील/हेड, मेन बेअरिंग, जॉ क्रशर, इरेक्टर, मेन शील्ड, टेल शील्ड आणि भुयारीकरण ऑपरेशन्सना सपोर्ट करणाऱ्या ४ विशेष गॅन्ट्रीजसह अनेक महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत. हे मशीन मिक्सशील्ड प्रकारातील, सेमी-ऑटोमॅटिक आणि स्लरी-बेस्ड टीबीएम म्हणून कॉन्फिगर केलेले आहे.
ही असतील आव्हाने
'टीबीएम 'च्या लाँचिंगसाठी, मुंबईतील सावली येथे जमिनीच्या पातळीखाली ३९ मीटर खोल शाफ्ट म्हणजेच १२ मजली इमारतीइतका खोल खड्डा तयार करण्यात आला आहे. शाफ्टमधील मर्यादित जागेचा योग्य वापर करण्यासाठी, टीबीएमचे भाग सुटे करून खाली उतरवण्यात आले. गॅन्ट्रीज आधी खाली उतरवण्यात आल्या आणि आधीच बांधलेल्या एनएटीएम बोगद्याच्या आत ढकलल्या गेल्या. त्यानंतर मेन शील्ड आणि कटरहेड खाली उतरवण्यात आले.