घारापुरी बेटावर पाणीटंचाईचे संकट; जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्याने स्थानिकांमध्ये नाराजी

फिल्टर प्लांटमधून मोरा बंदरावर पाणी पोहचविण्यासाठी भूस्तर टाकी बांधण्याचे कामे करण्यात येणार आहेत.
घारापुरी बेटावर पाणीटंचाईचे संकट; जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्याने स्थानिकांमध्ये नाराजी

उरण : जागतिक वारसास्थळ असलेल्या घारापुरी बेटावरील जलजीवन मिशन योजनेचे काम रखडल्यामुळे यावर्षी घारापुरी बंदरावर पाण्यासाठी वणवण करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे आणि येथे असलेल्या एकमेव धरणाची गळती थांबत नसल्यामुळे पाण्याची पातळी खालावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे येथील स्थानिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. धरणाची पातळी खालावल्यामुळे घारापुरी बेटावर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.

घारापुरी बेटावर जलजीवन मिशनअंतर्गत १ कोटी ५१ लाखांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. मात्र या योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. तर दुसरीकडे येथे असलेल्या धरणाच्या दुरुस्तीचे काम देखील अद्याप लाल फितीत अडकून पडले आहे. घारापुरी बंदराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या या मातीच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने जिल्हा परिषदेकडून या बंधाऱ्याला धातूची फ्लेम टाकण्यात आली होती. मात्र ही फ्लेम देखील खराब झाल्यामुळे पुन्हा एकदा या धरणातून पाणी अधिक गतीने झिरपत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या बेटावर असलेल्या धरणाच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग (धरण), नाशिक या विभागाकडून माती परिक्षणाचा आणि दुरुस्तीचा अभिप्राय मागविला आहे. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीकडेही पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे येथील पाणी समस्येचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत घारापुरी बंदरावर फिल्टर प्लांटपासून नवीन टाकीपर्यंत १०० एमएमची नवीन पाइपलाईन टाकणे, नवीन टाकी बांधणे, या नवीन टाकीतून शेतबंदर, मोराबंदर पाणीपुरवठा करणे, मोरा बंदरावर पाणी साठवणूकीची भूस्तर टाकी बांधणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.

दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा

फिल्टर प्लांटमधून मोरा बंदरावर पाणी पोहचविण्यासाठी भूस्तर टाकी बांधण्याचे कामे करण्यात येणार आहेत. बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी पाणी साठा करणाऱ्या या धरणात मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी साठा उपलब्ध असतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धरणातील पाणी साठा देखील कमी प्रमाणात शिल्लक राहिलेला आहे. जेमतेम पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याने तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना पाणीपुरवठा कसा करावा, असा गंभीर प्रश्न आता घारापुरी ग्रामपंचायतीला पडला आहे.

घारापुरीला सर्व सामान बोटीतून न्यावे लागते आणि पुन्हा मजुरांच्या सहाय्याने कामाच्या ठिकाणी पोहचविण्यात येते. सध्या बेटावर पाइप पोहचविण्याचे कामे सुरू आहे. लवकरच जलजीवन मिशनचे काम सुरू होईल.

- भातेश चव्हाण (उप अभियंता, रा.जि.प. पाणीपुरवठा विभाग)

logo
marathi.freepressjournal.in