घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : अर्षद खानचा जामीन अर्ज फेटाळला
मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अर्षद खान याला मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी दणका दिला. न्यायालयाने अर्षद खान याच्या सुटकेची मागणी मान्य करण्यास नकार देत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
घाटकोपर छेडा नगर येथील पेट्रोल पंपावर असलेले १२० बाय १२० फुटांचे भलेमोठ होर्डिंग कोसळल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेत १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ८० हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी आणि जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे व व्यावसायिक अर्षद खान या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या खटल्याच्या संदर्भात साक्ष नोंदवण्यासाठी नोटीस पाठविल्यानंतर सात महिन्यांपासून फरार असलेल्या खान याला गेल्या महिन्यात लखनऊ येथून अटक करण्यात आली होती. होर्डिंग उभारणारी इगो मीडिया किंवा त्यासाठी परवानग्या देणाऱ्या सरकारी यंत्रणेशी आपला कोणताही संबंध नाही. एफआयआरमध्येही आपले नाव नाही असा दावा याचिकाकर्त्याने केला. याशिवाय या प्रकरणातील इतर आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आपलाही जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती करत त्याने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली.