

ठाणे : मुंबई महानगर वाहतुकीची महत्त्वाची धुरा असलेल्या घोडबंदर रस्त्यावरील सातत्यपूर्ण वाहतूककोंडी आणि दुरुस्तीची समस्या दूर करण्यासाठी हा रस्ता ठाणे व मीरा-भाईंदर हस्तांतरित महापालिकांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मीरा-भाईंदर महापालिकेकडे रस्त्याचे हस्तांतरण पूर्ण झाले असून, आता ठाण्याकडे हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळत आहे. यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आग्रही भूमिका घेतली आहे.
मात्र, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रस्ता ताब्यात घेण्यापूर्वी महत्त्वाची अट ठेवली आहे. घोडबंदर रस्ता ताब्यात घेण्यास महापालिका तयार आहे, परंतु सध्याचे संबंधित प्राधिकरण रस्ता पूर्णपणे योग्य स्थितीत करून देईल, तेव्हाच ताबा घेण्यात येईल, असे त्यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. रस्ता ताब्यात घेण्यापूर्वी संपूर्ण दुरुस्ती आणि रस्ता सुस्थितीत झाल्याची खात्री झाल्याशिवाय ठाणे महापालिका पुढाकार घेणार नाही, ही अट आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केली.
कोंडी-खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
घोडबंदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यात मेट्रो व सेवा रस्त्यांच्या कामांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. पावसाळ्यात खड्डयांची समस्या वाढते. रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएसह विविध प्राधिकरणांकडे पसरल्यामुळे दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची, हे स्पष्ट नाही. त्यामुळे दुरुस्तीची जबाबदारी प्रत्यक्षात ठाणे महापालिकेवरच येते. संबंधित विभाग निधीअभावाचे कारण सांगत असल्याने महापालिकेलाच हा बोजा उचलावा लागत आहे.
हस्तांतरण प्रक्रियेला गती
गायमुख फाऊंटन रस्ता मीरा-भाईंदर महापालिकेकडे पूर्वीच वर्ग झाला आहे. आता कापूरबावडी ते गायमुख या उर्वरित भागाचे हस्तांतरण ठाणे महापालिकेकडे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अलीकडील बैठकीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावरील डागडुजी व पुनर्पुष्टीकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच गायमुख घाटाचे काम पूर्ण होताच रस्ता ठाणे महापालिकेकडे वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचे आदेशही देण्यात आले.