
ठाणे : घोडबंदर सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे या मार्गावर महावितरणचे मोठे ट्रान्सफॉर्मर, ओव्हरहेड वायर आणि तब्बल ४० ते ४५ विद्युत पोल रस्त्याच्या मधोमध आल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
रस्ता पूर्णत्वाकडे जात असताना हे ट्रान्सफॉर्मर व पोल हटविण्याची मोठी कसरत आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) करावी लागणार आहे. या शिफ्टिंगच्या कामासाठी तब्बल ६९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महावितरणकडून करावा, अशी मागणी ठाणे महापालिकेने केली होती. परंतु आता हा आर्थिक भार थेट महापालिकेच्या तिजोरीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीए, ठाणे महापालिका आणि इतर प्राधिकरणांची संयुक्त बैठक झाली होती.
या बैठकीत या कामाच्या शिफ्टिंगसंबंधी चर्चा झाली होती. त्यावेळी महावितरणने हा खर्च शासनाने करावा अशी भूमिका घेतली होती. मात्र, आता हा खर्च महापालिकेच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे.
शिफ्टिंगसाठी ६९ कोटींचा प्रस्ताव तयार
कापूरबावडी ते गायमुख या मार्गात सुमारे ८ ट्रान्सफॉर्मर आणि ४५ विद्युत पोल आहेत. हे सर्व हटवून नव्या जागी विद्युत वाहिन्या बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात ६९ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला असून महावितरण आणि एमएमआरडीए यांच्यात या शिफ्टिंगच्या कामाबाबत अंतिम चर्चा सुरू असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
५६० कोटींच्या प्रकल्पात हजारो झाडांचा बळी
कापूरबावडी ते गायमुख असा सुमारे १०.५० किलोमीटर लांबीचा हा रस्ता पूर्णपणे काँक्रीटीकरणाच्या माध्यमातून तयार केला जात आहे. या कामासाठी ५६० कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. या प्रकल्पात २,१९६ वृक्ष बाधित झाले असून त्यापैकी केवळ ५४९ वृक्षांचे पुनर्रोपण होणार आहे. उर्वरित १,६४७ झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी अपघातवाढीची आणि पर्यावरणहानीची भीती व्यक्त केली आहे.
रस्त्याच्या मधोमध ट्रान्सफॉर्मर आणि पोल
सध्या १०.५० किमीच्या मार्गात महावितरणचे डीपी, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत पोल हे रस्त्याच्या मध्यभागीच ठिकठिकाणी आले आहेत. या धोकादायक स्थितीमुळे वाहतुकीचा वेग कमी होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. सध्या अशा ठिकाणी लाल पट्ट्या आणि बॅरिकेड्स लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.