उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील दसरा मैदान परिसरात एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय सुरक्षा रक्षकाने त्याच इमारतीत राहणाऱ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची नेपाळची असून ती आपल्या आईवडिलांसह उल्हासनगर शहरात राहते. तिचे वडील याच इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. आरोपी १७ वर्षीय युवक देखील याच इमारतीत दिवसपाळीला सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचा मूळचा पत्ता राजस्थान राज्यात आहे आणि उल्हासनगरमध्ये त्याचे कुटुंब बऱ्याच वर्षांपासून राहत आहे. आरोपी फुगे विकण्याचे कामही करत असतो. शनिवारी दुपारच्या वेळी मुलगी घरात एकटीच होती. तिचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले होते. याची संधी साधून आरोपीने मुलीच्या घरी प्रवेश केला आणि दरवाजा बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी शेजारी राहणाऱ्या एका रहिवाशाला बंद दरवाजाचा संशय आल्याने त्याने दरवाजा उघडला. त्यावेळी त्याला मुलगी रडताना दिसली. तत्काळ रहिवाशांनी पोलीसांना संपर्क साधला.