पदवीधर निवडणुकीची चुरस वाढली; राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष रिंगणात

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी नवी मुंबईतील कोकण भवन येथे भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि...
छाया : दीपक कुरकुंडे
छाया : दीपक कुरकुंडे

ठाणे/नवी मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी नवी मुंबईतील कोकण भवन येथे भाजप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवारांनी अर्ज दाखल केले. शिवाजीराव नलावडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी तर अमित सरैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) कडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याचबरोबर शिवनाथ दराडे यांनी भाजपचे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला आणि किशोर जैन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार दिल्याने पदवीधर निवडणुकीची चुरस वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांनी, विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित सरैय्या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारासंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैय्या यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सह निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे निरंजन डावखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून, मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डावखरे यांनी आभार मानले. तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन मनसेचा उमेदवार मागे घेतला, याबद्दल डावखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केला.

उबाठा-भाजप आमनेसामने

कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच विधान परिषद शिक्षण मतदारसंघासाठी मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी कोकण आयुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस आणि सेना कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. त्यात पहिल्या माळ्यावर नवी मुंबई उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकारी आणि पोलिसांची अरेतुरेवरून वादावादी झाली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.

गेल्या १२ वर्षांत कोकणाच्या सर्वतोपरी विकासासाठी कार्य केले असून, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. कोकणामध्ये रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळेल. तसेच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महायुतीच्या उमेदवारीबाबत मार्ग निघून महायुतीची एकत्रित ताकद दिसून येईल. - निरंजन डावखरे, महायुती उमेदवार

कोकण पदवीधर मतदारसंघात परिवर्तन नक्की होईल. केवळ मॅसेजवरून एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकणातून कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि त्यांनी दाखवून दिले पदवीधरची निवडणूक शिवसेना जिंकणार. ही लोकशाहीची प्रक्रिया आहे. अर्ज कोणीही भरू शकतो, महायुतीमध्ये देखील भरपूर नावं होती, मात्र आज ती नावं कमी झालेली दिसत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच संघर्ष या कोकण पदवीधर मतदारसंघात होणार, असा मला विश्वास आहे. - किशोर जैन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

भिवंडीतून नागेश निमकरचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

भिवंडी : भिवंडी शहर आणि ठाणे कोकणातील नागरी समस्या निवारणासाठी भिवंडीतील समाजसेवक नागेश किसनराव निमकर यांनी गुरुवारी कोकण आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे विधान परिषद कोकण पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत रमेश भावसार, दिलीप गायकवाड, शंकर कालेकर, सागर दीवार आदी समर्थक उपस्थित होते. नागेश निमकर हे विधायक कामांसाठी जाणले जातात. यासह शासनाच्या अनेक पॉलिसीवर त्यांनी काम केले असून या क्षेत्रात त्यांना चांगला दांडगा अनुभव आहे. दरम्यान, मी नागरिकांच्या हितासाठी कोकणात अनेक वर्षांपासून भरीव काम करीत असून याचप्रमाणे नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही निमकर यांनी दिली असून ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकणातील ५ जिल्ह्यांतील पदवीधर मतदारांनी मला भरघोस मतदान करून विजयी करावे, असे आवाहन नागेश निमकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in