ठाण्यात महायुतीचा महामेळावा; ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी १५ पक्षांची वज्रमूठ

पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे.
ठाण्यात महायुतीचा महामेळावा; ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी १५ पक्षांची वज्रमूठ

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात १४ जानेवारी रोजी तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी पाच वाजता महायुतीतील १५ पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. पालक मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे.

महायुतीतील १५ पक्षांच्या ठाणे येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश मस्के, माजी खासदार संजीव नाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रिपब्लिकन पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, भाजपचे विभागीय सचिव हेमंत म्हात्रे आदींसह महायुतीतील पदाधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यात १४ जाने. रोजी एकाच दिवशी मेळावे होणार आहेत. ठाणे येथील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यात तिन्ही लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांची वेळ उपलब्ध झाल्यास ते मेळाव्याला उपस्थित असतील, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ४५ खासदार निवडून आणण्याचा महायुतीचा निर्धार आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथे महायुतीचेच उमेदवार जिंकतील, असा विश्वास परांजपे यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in