
देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव व स्वराज महोत्सव अंतर्गत बुधवारी सकाळी ११ ते १ या वेळेत नियोजित सामूहिक राष्ट्रगीत गायन उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन एक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल होत. या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात "समुह राष्ट्रगीत गायन" उपक्रम संप्पन झाला. यावेळी ठाण्यातील रेल्वे प्रवाशांनी ही प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला.
ठाणे रेल्वे स्थानकात ठाणे पोलीस व रेल्वे पोलिसांच्या वतीने सामूहिक राष्ट्रागीताच गायन करण्यात आले. स्टेशन परिसरातील रेल्वे प्रवाशांनी आहे त्या ठिकाणी उभे राहून या उपक्रमाला साथ दिली. तर या उपक्रमाबद्दल राज्य सरकारकडून आधी सूचना व जनजागृती केली नसल्याने बहुतांश नागरिकांना याबाबत काहीच माहीत नसल्याचे दिसुन आले. या उपक्रमाबद्दल राज्य सरकारने दोन दिवस आधीच जनजागृती केली असती तर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असता अशा प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी दिल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात सर्वत्र 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' व 'स्वराज्य महोत्सव' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 'समुह राष्ट्रगीत गायन' पार पडले. तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात झाले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.