ठाण्यातील गतिरोधक पालिकेने हटवले; आयआरसीच्या नॉर्मनुसार मास्टिक पद्धतीने होणार गतिरोधकांची बांधणी

जुने गतिरोधक हटवून नव्याने बांधण्यात येणारे सर्व गतिरोधक हे आयआरसीच्या नॉर्मनुसार तसेच गतिरोधकांच्यावर मास्टिकचे आवरण देऊन बांधण्यात येणार असून, यामुळे हे गतिरोधक चांगले टिकणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाण्यातील गतिरोधक पालिकेने हटवले; आयआरसीच्या नॉर्मनुसार मास्टिक पद्धतीने होणार गतिरोधकांची बांधणी

ठाणे : आयआरसीच्या नॉर्मनुसार नसलेले आणि वाहनचालकांसाठी त्रासदायक ठाणे शहरातील १०० पेक्षा अधिक गतिरोधक ठाणे महापालिकेने काढले आहेत. पालिकेच्या या विशेष मोहिमेमुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी बांधण्यात आलेल्या गतिरोधकांवर डांबरचे आवरण असल्याने हे सर्व गतिरोधक खराब झाले होते. मात्र आता जुने गतिरोधक हटवून नव्याने बांधण्यात येणारे सर्व गतिरोधक हे आयआरसीच्या नॉर्मनुसार तसेच गतिरोधकांच्यावर मास्टिकचे आवरण देऊन बांधण्यात येणार असून, यामुळे हे गतिरोधक चांगले टिकणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

गतिरोधकाबाबत आयआरसीच्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कार्यकारी अभियत्यांनी आपापल्या विभागात ड्राईव्ह घेवून जे गतिरोधक आयआरसीच्या नॉर्मनुसार नाहीत. त्याची यादी करण्याचे निर्देश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. त्याचसोबत रबराचे स्पीड ब्रेकर असतील ते काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. ज्या ठिकाणी तात्पुरते गतिरोधक बसवायचे असतील तर ते देखील आयआरसीच्या नॉर्मनुसार बसवावेत, तसेच शहरातील सर्व गतिरोधक आयआरसीच्या नॉर्मनुसार असतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी आयआरसीच्या नॉर्मनुसार नसलेले आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले गतिरोधक काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली होती. यामध्ये आजच्या तारखेला १०० पेक्षा अधिक गतिरोधक काढून टाकण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी दिली आहे. तर आयआरसीच्या नॉर्मनुसार शास्त्रशोक्त पद्धतीने गतिरोधकही बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी बांधण्यात आलेल्या गतिरोधकांवर डांबराचे आवरण असल्याने हे गतिरोधक लवकर खराब होत होते; मात्र आता नव्याने बांधण्यात येणाऱ्या गतिरोधकांवर मास्टिकचे आवरण लावण्यात येणार आहे.

गतिरोधकांबाबत काय होत्या तक्रारी?

शहरात जे गतिरोधक बांधण्यात आले होते ते सर्व गतिरोधक हे आयआरसीच्या नॉर्मनुसार बांधण्यात आलेले नव्हते. याशिवाय काही गतिरोधक कमी उंचीचे, तर काही गतिरोधक हे जास्त उंचीचे बांधण्यात आले होते. त्यामुळे कमी उंचीच्या गाड्या तर अक्षरशः या गतिरोधकांना घासून जात होत्या. परिणामी अनेक गतिरोधकांची दुरवस्था झाली होती. विशेष करून दुचाकीस्वारांसाठी हे सर्वच गतिरोधक घातक होते. यावर बाइक नेताना अनेक बाइकस्वारांचा तोल जाऊन अपघाताचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले गतिरोधक हटवण्याची मागणी अनेक वाहनचालकांकडून करण्यात आली होती.

२ लाख रनिंग मीटरचेही जॉइंट भरले...

चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले केवळ गतिरोधक न हटवता अपघातांसाठी कारणीभूत ठरलेल्या रस्त्यांमधील जॉइंट भरण्याची कारवाई देखील या दीड महिन्यात पालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या दीड महिन्यात तब्बल २ लाख रनिंग मीटर जॉइंट भरले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे. रस्त्यामध्ये गॅप पडल्यास अनेकवेळा अपघात होत होते. त्यामुळे हे काम युद्धपातळीवर करण्यात आले आहे. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर अनेक छोट्या मोठ्या रस्त्यांचे जॉइंट देखील भरण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in