उल्हासनगर : खोट्या कागदपत्रांवर मिळवला GST परतावा; राज्यकर विभागाने उघडकीस आणला महाघोटाळा!

उल्हासनगर शहरात राज्यकर विभागाच्या कारवाईतून तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांच्या जीएसटी फसवणुकीचा महाघोटाळा उघडकीस आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर : खोट्या कागदपत्रांवर मिळवला GST परतावा; राज्यकर विभागाने उघडकीस आणला महाघोटाळा!
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात राज्यकर विभागाच्या कारवाईतून तब्बल १ कोटी ८५ लाख रुपयांच्या जीएसटी फसवणुकीचा महाघोटाळा उघडकीस आल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ‘मे. स्प्लॅश ट्रेडर्स’ या व्यापाऱ्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट जीएसटी नोंदणी मिळवून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने सखोल तपास सुरू केला आहे.

प्राथमिक तपासात व्यापारी नरेश याकुब आठवले आणि इतर अज्ञात व्यक्तींनी बनावट दस्तऐवज तयार करून तब्बल १,८५,८८,८५१ रुपयांचा परतावा बँक खात्यात जमा करून घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यकर विभागाच्या अन्वेषण शाखेने उघडकीस आणलेल्या या करफसवणुकीमुळे जीएसटी व्यवस्थेतील पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

२०१९ मध्ये दाखल झालेल्या तक्रारीच्या आधारे विभागाने ‘स्प्लॅश ट्रेडर्स’च्या व्यवहारांबाबत चौकशी केली असता शासनाला मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे स्पष्ट झाले. सहाय्यक राज्यकर आयुक्त ईश्वरचंद्र पवार यांच्या तक्रारीवरून राज्यकर निरीक्षक अनिल चव्हाण यांनी तपास सुरू केला. या तपासात उघड झाले की, नोंदणी प्रक्रियेदरम्यान व्यापाऱ्याने स्वतःचे नसलेले पत्ते, खोटे ईमेल आयडी आणि बनावट बँक खाते तपशील वापरून जीएसटी नोंदणी मिळवली होती.

‘स्प्लॅश ट्रेडर्स’ने नोंदणी अर्जात व्यवसायाचा पत्ता बी.के. ७२८, संतोषी माता मंदिराजवळ, पंजाबी कॉलनी रोड, उल्हासनगर असा दिला होता. २७ एप्रिल २०१९ रोजी या ठिकाणी झडती घेण्यात आली असता, व्यापारी नरेश आठवले उपस्थित होते. मात्र, ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरू नसल्याचे आणि जीएसटी नोंदणीशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळले.

ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून या फसवणुकीतील अज्ञात सहआरोपींचा शोध सुरू असून, बँक व ईमेल ट्रेलच्या आधारे डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विभागीय पातळीवर जीएसटी नोंदणी प्रक्रियेत पडताळणी मजबूत करण्यासाठी नवीन सुरक्षा उपाययोजनांवर विचार सुरू झाला आहे.

१.८५ कोटींचा परतावा जमा

चौकशीत आठवले यांनी स्पष्ट केले की त्यांचा ‘स्प्लॅश ट्रेडर्स’शी कोणताही संबंध नाही. त्यांनी नोटरीकृत शपथपत्र सादर करून कागदपत्रांचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त केली. दरम्यान, ‘स्प्लॅश ट्रेडर्स’ने जीएसटी परताव्यासाठी बनावट बिले व खोटे व्यवहार दाखवले. तपासात उघड झाले की, या फर्मच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र, दादर शाखा येथील खात्यावर शासनाकडून १.८५ कोटींचा परतावा जमा झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in