उल्हासनगर : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. आंतरराष्ट्रीय इंधन बाजारातील अस्थिरतेमुळे व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमती वाढल्या असून काही ठिकाणी पुरवठ्याचा तुटवडाही निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा थेट फटका मुंबईसह उपनगरातील हॉटेल व्यवसायाला बसत असून उल्हासनगरमधील हॉटेल, धाबे आणि पोळी-भाजी केंद्र चालवणाऱ्या लहान व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
वाढते खर्च, अनिश्चित पुरवठा आणि ग्राहकांचे मर्यादित बजेट या तिन्ही घटकांमुळे स्थानिक खाद्य व्यवसाय सध्या तणावाखाली आहे. उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल, फास्टफूड सेंटर, धाबे तसेच घरगुती पातळीवर चालवले जाणारे पोळी-भाजी केंद्र कार्यरत आहेत. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायांवर अवलंबून आहे. उल्हासनगरमध्ये चालणाऱ्या पोळी-भाजी केंद्रांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. घरगुती गॅस किंवा व्यावसायिक गॅसवर चालणाऱ्या या छोट्या व्यवसायांमध्ये नफा आधीच मर्यादित असतो. गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे त्यांचा खर्च वाढला असून काही महिलांना दररोजचा व्यवसाय टिकवणे कठीण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
गॅस वितरकांच्या माहितीनुसार घरगुती गॅस पुरवठा सध्या सुरळीत सुरू असला तरी व्यावसायिक गॅसच्या मागणीत अचानक वाढ झाल्याने काही ठिकाणी सात ते आठ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर आणखी गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हॉटेल मालक आणि व्यापारी संघटनांनी केंद्र व राज्य सरकारकडून व्यावसायिक गॅसच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि पुरवठा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लहान-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांसाठी येणारे दिवस अधिक कठीण ठरू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी सरकारने ‘चूल बंद करा आणि गॅस वापरा’ असे सांगत सर्वांना एलपीजीकडे वळवले. आम्हीही ते मान्य करून आमचा संपूर्ण व्यवसाय गॅसवर चालवू लागलो. मात्र आता गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत आहे आणि पुरवठ्यातही तुटवडा निर्माण होत असल्याने आमच्यासारख्या लहान खानावळ चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.आम्हाला पर्याय म्हणून रॉकेल किंवा लाकूड उपलब्ध करून द्यावे. आम्ही चूल मांडून का होईना, पण आमचा व्यवसाय सुरू ठेवू शकू.
ऋषिकेश गोडगे, श्री समर्थ कृपा खानावळ सेंटर
सध्या व्यावसायिक गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत आणि काही ठिकाणी पुरवठा वेळेवर मिळत नाही. हॉटेल व्यवसाय पूर्णपणे गॅसवर अवलंबून असल्यामुळे या परिस्थितीचा मोठा परिणाम आमच्यावर होत आहे. एका हॉटेलला दिवसाला दोन ते तीन सिलिंडर लागतात, त्यामुळे गॅस महाग झाला की थेट आमच्या रोजच्या खर्चात मोठी वाढ होते. दुसरीकडे ग्राहकांना जेवणाचे दर वाढवणे शक्य नाही, कारण सामान्य नागरिक आधीच महागाईने त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक लहान हॉटेलचालकांना तोट्यात व्यवसाय चालवावा लागतो. सरकारने व्यावसायिक गॅसच्या दरांवर नियंत्रण ठेवून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा लहान हॉटेल व्यवसाय टिकवणे कठीण होईल. -
उदय शेट्टी, सदस्य उल्हासनगर हॉटेल असोसिएशन