पिकनिक जीवावर बेतली! कल्याणच्या जीम ट्रेनर तरुणाचा शहापूरच्या सहलीदरम्यान पाण्यात बुडून मृत्यू

जीम ट्रेनर व रिल स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला विनायक अप्पा वाझे (३२) या तरुणाचा ओव्हळाच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील शेणवे जवळील साठगाव येथे रविवारी सायंकाळी घडली.
पिकनिक जीवावर बेतली! कल्याणच्या जीम ट्रेनर तरुणाचा शहापूरच्या सहलीदरम्यान पाण्यात बुडून मृत्यू
प्रातिनिधिक फ्रीपिक फोटो
Published on

शहापूर: जीम ट्रेनर व रिल स्टार म्हणून प्रसिद्ध असलेला विनायक अप्पा वाझे (३२) या तरुणाचा ओव्हळाच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील शेणवे जवळील साठगाव येथे रविवारी सायंकाळी घडली. वाहत्या पाण्यात विनायक हा तरुण रविवारी सायंकाळी बेपत्ता झाला होता. स्थानिक किन्हवली पोलीस व जीवरक्षक टीम व स्थानिक साठगाव ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर तब्बल २८ तासांनंतर पाण्यात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात सोमवारी सायंकाळी ५ वाजता यश आले आहे.

जीम ट्रेनर व रील स्टारच्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने कल्याण शहरातील व्यायामशाळा व त्याच्या खास चाहत्यांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी कल्याण येथून ९ जणांचा ग्रुप शहापूर तालुक्यातील साठगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शेणवा-खैरे रस्त्यालगत असणाऱ्या केरळा व्हीलेज येथे सहलीसाठी आले होते.

या रिसॉर्टच्या मागे असलेल्या ओव्हळावर पाण्यात पोहाण्यासाठी हे सर्व तरुण गेले होते आंघोळीसाठी पाण्यात उतरले पण यावेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला होता. यावेळी पोहायला उतरलेल्या या तरुणांपैकी विनायक वाझे या तरुणाला वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो ओव्हळाच्या वाहत्या पाण्यात बुडाला व त्याचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार, तहसीलदार परमेश्वर कासूळे तलाठी गणेश विशे साठगाव सरपंच पूजा विशे, पोलीस पाटील सचिन गायकवाड, उपसरपंच किशोर विशे स्थानिक ग्रामस्थ घनश्याम गायकवाड ग्रामसेवक रोहीदास बहिर, खैरे ग्रामस्थ यांनी धाव घेत जीवरक्षक टीमच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. विनायक अप्पा वाझे (३२) या तरुणाचा मृतदेह तब्बल २८ तासानंतर सोमवारी सायंकाळी मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. सदर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून शविच्छेदनासाठी हा मृत्यू शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे असे किन्हवली पोलिसांकडून सांगण्यात आले दरम्यान या घटनेची नोंद किन्हवली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in