बच्चू कडूंच्या निर्देशाने दिव्यांग स्टॉल्सना परवाने मिळणार

मीरा -भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉल्सना परवाने देण्यास बंद केले होते.
बच्चू कडूंच्या निर्देशाने दिव्यांग स्टॉल्सना परवाने मिळणार
Published on

भाईंदर : गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांसह गटई व दूध केंद्र स्टॉल्सना परवाने देण्यास चालढकल करणाऱ्या मीरा -भाईंदर महापालिकेला दिव्यांग मंत्रालयाच्या उपक्रमाचे अध्यक्ष मंत्री दर्जा असलेले आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निर्देशानंतर पालिकेने पहिल्या टप्प्यात दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर गटई व दूध केंद्र स्टॉल्सना परवाने दिले जाणार आहेत.

मीरा -भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉल्सना परवाने देण्यास बंद केले होते. वास्तविक शासनाने पूर्वीच स्टॉल धोरण मंजूर केले असताना नव्याने धोरण करायचे सांगत चालढकल केली जात होती, तर पूर्वी दिलेल्या परवान्यांचे सुद्धा नूतनीकरण करण्यास टाळाटाळ चालली होती. या दरम्यान काही दिव्यांग, गटई कामगारांचे स्टॉल पालिकेने तोडले होते. गेल्या काही काळापासून बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पालिकेत आंदोलने, मागण्या व बैठका झाल्या. परिणामी बच्चू कडू यांनी निर्देश दिल्यानंतर पालिकेने आता पहिल्या टप्प्यात दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलसाठी धोरण ठरवून तसा प्रशासकीय ठराव केला आहे. त्यानंतर दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्यासाठी अर्ज मागवले आहेत. पूर्वीच्या परवानगी मध्ये १०७ दिव्यांगांचे स्टॉल आहेत. आणखी सुमारे ४३ स्टॉल दिले जाण्याचे शक्यता वर्तवली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in