

ठाणे : सत्तेचा मलिदा खाण्यासाठी भाजप आणि शिंदे सेनेत भांडणाचे नाटक सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये टोळीयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी त्यांना सत्तेशिवाय राहवत नाही. त्यामुळे एकमेकांवर कितीही आरोप केले, तरी अखेरीस ते आपापसांत जुळवून घेतील, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी ठाण्यात केला. मनोज जरांगे-पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
सपकाळ यांनी शनिवारी प्रदीप पूर्णकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. तसेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या संघर्षावरही टीका केली. सत्ताधारी पक्षांमधील वाद जनतेच्या प्रश्नांसाठी नसून सत्तेतील लाभाच्या वाटपासाठी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाचशे कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या आरोपांपेक्षाही एकमेकांचे चारित्र्यहनन करणे, बदनामी करणे आणि राजकीय फायद्यासाठी व्यक्तींना एकमेकांविरोधात उभे करणे हा अधिक गंभीर मुद्दा असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. भाजपचे राजकारण कोणत्या स्तरावर गेले आहे आणि समाजात विष पसरवण्याचे प्रकार कशा पद्धतीने सुरू आहेत, हे या निमित्ताने दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुका जिंकण्यासाठी राजकारणाची पातळी किती घसरवली जात आहे, याचा विचार जनतेने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्रीपदावरूनही कुरघोडी
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी झाल्यानंतरच्या राजकीय घडामोडींवरही सपकाळ यांनी भाष्य केले. वरकरणी एकमेकांचे विरोधक असल्याचे चित्र निर्माण केले जात असले, तरी सत्तेच्या राजकारणात ते पुन्हा एकत्र येतील, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित व्यापाऱ्यांच्या राष्ट्रीय मोर्चाबाबत बोलताना हा एक दिवसाचा कार्यक्रम असून, नागरिकांना त्रास होणार नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
आरोपांची शहानिशा का नाही?
सध्याच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. आरोप झाले, तक्रार दाखल झाली आणि पुरावे समोर आले, तर संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची नावे चर्चेत येत असताना या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे सपकाळ म्हणाले. आरोपांची शहानिशा न करता कोणालाही दोषी ठरवता येणार नाही; मात्र, पुरावे असतील तर कारवाई टाळता कामा नये, अशी भूमिका सपकाळ मांडली.